बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे - मागासप्रवर्गासाठी बनावट जातप्रमाणपत्र सादर करून ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविलेल्या एका विद्यार्थ्यासह अन्य एका विद्यार्थिनीविरुद्ध महाविद्यालय प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. महाविद्यालयाची फसवणूक केल्यामुळे महाविद्यालयाने दोन्ही विद्यार्थ्यांची महाविद्यालयातून हकालपट्टी केली आहे. 

याप्रकरणी अभिजित भोसले (वय ४८, रा. येरवडा) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यावरून पिंपळे गुरव येथे राहणारा २० वर्षीय विद्यार्थी व नाना पेठेत राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक डी. एन. ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले हे ‘एआयएसएसएमएस’ या शैक्षणिक संस्थेचे प्रशासक अधिकारी आहेत. संस्थेच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ (आरटीओ) असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शासनाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश दिला जातो. प्रवेशानंतर महाविद्यालयाकडे जमा करण्यात आलेली विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तंत्रशिक्षण विभागाच्या विभागीय कार्यालयाकडे पाठविली जातात. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्याने मागील वर्षी द्वितीय वर्ष, तर विद्यार्थिनीने प्रथम वर्षासाठी स्पेशल क्‍लास, या सत्रासाठी प्रवेश घेतला होता. त्या वेळी त्यांनी त्यांची सर्व मूळ कागदपत्रे महाविद्यालयामध्ये जमा केली. त्यानंतर महाविद्यालयाने जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विभागीय समितीकडे पाठविले. 

त्या वेळी समितीला संबंधित विद्यार्थ्यांनी सादर केलेले विशेष मागास प्रवर्गाचे जातप्रमाणपत्र बनावट व बोगस असल्याचे निदर्शनास आले. समितीने ही माहिती महाविद्यालयास दिली. त्यानंतर महाविद्यालयाने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयास याबाबतची माहिती दिली. तंत्रशिक्षण कार्यालयाकडून दोन्ही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश महाविद्यालयास दिला होता. त्यानुसार भोसले यांनी फिर्याद दाखल केली.

Web Title: pune news bogus cast certificate