कॉमर्समधूनही करिअर ठरेल फायदेशीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

वाणिज्य शाखा आता केवळ बॅंक सेवेपुरती मर्यादित राहिलेली नाही. या शाखेत बारावी वा पदवीचे शिक्षण घेऊन चांगले करिअर करता येते. कॉमर्स करून कोणते करिअर करता येते, याविषयी ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’वर मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्यावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक यांनी दिलेली उत्तरे.  

वाणिज्य शाखा आता केवळ बॅंक सेवेपुरती मर्यादित राहिलेली नाही. या शाखेत बारावी वा पदवीचे शिक्षण घेऊन चांगले करिअर करता येते. कॉमर्स करून कोणते करिअर करता येते, याविषयी ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’वर मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्यावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक यांनी दिलेली उत्तरे.  

प्राप्तिकर विभागात (इन्कम टॅक्‍स) नोकरी मिळविण्यासाठी काय करावे लागते. त्यासाठी कोणती तयारी करावी लागते.
- प्राप्तिकर विभागात प्रथम वर्ग अधिकाऱ्यांच्या जागा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जातात. त्यासाठी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसची (आयआरएस) परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून यूपीएससीची तयारी करणे आवश्‍यक आहे. कर विभागांमध्ये लिपिकांच्या जागा हे विभाग स्तरावर परीक्षा घेऊन भरल्या जातात. त्याचे नोटिफिकेशन संकेतस्थळावर नियमितपणे प्रसिद्ध होतात. यासाठी पदवी घेतल्यानंतर अर्ज करता येतो.

गुंतवणूक सल्लागार बनण्यासाठी काय करावे लागेल?
- गुंतवणूक सल्लागार बनण्यासाठी सीएफटी (सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर) अशी परीक्षा असते. नॅशनल स्टॉक एक्‍सचेंज सर्टिफिकेशन इन फायनान्शियल मार्केटचे पाच पेपर देऊन त्यात पात्र ठरल्यास तुम्ही गुंतवणूक सल्लागार म्हणून आवश्‍यक असणारी सीएफटीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. त्यानंतर तुम्ही सल्लागार म्हणून काम करू शकता.

स्टॉक मार्केटमधील करिअर कसे करता येते?
- फायनानशियल मार्केटमध्ये करिअर करायचे असल्यास आपल्याला नॅशनल स्टॉक एक्‍सचेंज सर्टिफिकेशन इन फायनान्शियल मार्केटचे कॅपिटल मार्केट बिगिनर आणि कॅपिटल मार्केट ॲडव्हान्स हे पहिले दोन पेपर उत्तीर्ण होऊन एखाद्या ब्रोकरकडे काही काळ उमेदवारी करावी लागेल. त्यानंतर पदवी पूर्ण करून एमबीए फायनान्स केल्यास स्टॉक मार्केटमध्ये खूप करिअरच्या संधी आहेत.

कॉमर्समधून सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जाता येते का?
- सध्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जर डेटा बेस मॅनेजमेंट सिस्टिम येत असेल, तर तर भरपूर करिअरच्या संधी आहेत. कॉमर्सच्या मुलांना पदवी शिक्षण घेता घेता एसएपी (सॅप सिस्टिम)चे फायन्शीयल, मार्केटिंग, एचआर आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट मोड्यूलचे प्रशिक्षण घेतल्यास करिअरच्या उत्तम संधी आहेत. ओरॅकलसारख्या सॉफ्टवेअरचा प्रोग्रामिंगचा कोर्स केल्यास खूप चांगले भवितव्य आहे.

बिझनेस करायचा असल्यास बारावी कॉमर्सनंतर कोणते शिक्षण घ्यावे?
- मुळातच व्यवसाय शिक्षण हा उच्च शिक्षणाचा भाग आहे. पदवी घेताना बिझनेस आंत्र्यप्रुनरशिप हा विशेष विषय घेऊन नवीन व्यवसाय सुरू करण्याबाबत योग्य पद्धतीने उद्योगांना भेटी आणि महाविद्यालयातील येणाऱ्या सर्व अभ्यागत शिक्षकांना आपल्या कल्पनांबाबत जर विचारत राहिले, तर एखादी चांगली कल्पना व्यवसायासाठी भविष्यात प्रेरक ठरू शकेल. बिझनेस आंत्र्यप्रुनरशिपसाठी आयआयएमच्या सर्वच संस्थांमध्ये वेगळे विभाग आहेत. सरकारचे वेगवेगळे अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहेत.

बारावीत परकी भाषा शिकल्याचा भविष्यात कोणता उपयोग होईल?
- परकी भाषा ही सध्या अतिशय महत्त्वाचे कौशल्य म्हणून रोजगाराच्या संधी उपयुक्त आहे. बारावीपर्यंत केलेली परकी भाषा पुढील शिक्षणावेळी नियमित करता येते. आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयात करिअर करताना परकी भाषेचा खूप मोठा उपयोग आहे. 

परदेशात एमबीए करायचे असल्यास आतापासून काय तयारी करावी?
- परदेशात एमबीए करण्यासाठी त्यांच्या नियमांनुसार चार वर्ष शिक्षण घेतलेली पदवी आवश्‍यक आहे. भारतात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय सोडून इतर सर्व पदव्या तीन वर्षांच्या आहेत. आपली असलेली पदवी घेऊन एक वर्षाचे उच्च पदवीचे शिक्षण घ्यावे लागते. ते घेताना ज्या परदेशी विद्यापीठांमध्ये एमबीए करायचे आहे. त्यांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. आज काल सर्व परदेशी विद्यापीठे तुमच्या पदवी महाविद्यालयातील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपण सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र महाविद्यालयांकडून मागवितात. त्या दृष्टीने आपण पदवी शिक्षण घेताना सजग असणे आवश्‍यक आहे.

कन्सल्टन्सी कोणकोणत्या प्रकारची करता येते. बारावी कॉमर्सनंतर त्यासाठी कोणती तयारी करावी?
- मॅनेजमेंट, आयएओ, टॅक्‍स, कॉस्ट, आयपीआर (इंटेलेक्‍च्युल पॉपर्टी राईट) इत्यादी कन्सलटन्सी कॉमर्सनंतर करता येतात; पण यातील प्रत्येक कन्सलटन्सीसाठी त्या प्रकारचे विशेष ज्ञान व अनुभव आवश्‍यक आहे. त्याचे शिक्षण अल्पमुदतीच्या कोर्समधून घेता येते आणि त्या प्रकारच्या संस्थेत काही वर्षे काम केल्यावर स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो.

वाणिज्य शाखेतून यूपीएससी करता येते का, त्यासाठी काय करावे लागते?
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये कॉमर्स स्पेशल घेऊन बसता येते. त्यासाठी कॉमर्समधील सर्व विषयांचे सखोल ज्ञान असणे आवश्‍यक आहे. पुण्यात कॉमर्स स्पेशल घेऊन यूपीएससीसाठी कोचिंग उपलब्ध नाहीत. त्यासाठी दिल्ली, हैदराबाद, बंगळूर अशा ठिकाणी जावे लागेल.

टुरिझममध्ये करिअर करायचे असल्यास काय करता येईल?
- बारावीनंतर बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम असा कोर्स उपलब्ध आहे. तसेच नियमित पदवी घेतल्यानंतर टुरिझम स्पेशल घेऊन एमबीए घेता येऊ शकते. टुरिझममध्ये करिअरच्या उपशाखा खूप आहेत. यामध्ये हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन, टूर गाइड, टूर प्लॅनर, टूर सर्व्हिस एक्‍झिबिटर अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी भटकंतीची आवड असणे आणि प्रत्येक ठिकाणची विशेष माहिती असणे गरजेचे आहे.

Web Title: pune news career in commerce