सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी "गरवारे'मध्ये अभ्यासक्रम 

सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी "गरवारे'मध्ये अभ्यासक्रम 

पुणे - "पाल म्हटलं की ती विषारी असते...साप दिसला की पहिलं त्याला मारून टाका, आपल्या घराजवळ साप नको रे...!, अशी वाक्‍य अनेक वेळा कानावर पडतात. खरंतर पाल, साप, बेडूक, सरडे हे प्राणिविश्‍वातील अत्यंत दुर्लक्षित प्राणी म्हणावे लागतील. अनेक वेळा अशा प्राण्यांची नावे घेतली की नागरिक "आईऽऽ गं', "ईईऽऽ', "नको बाईऽऽ' अशी नकारात्मक प्रतिक्रिया देतात. त्याला कारणही अगदी तसेच असल्याचे म्हणता येईल. या प्राण्यांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. परंतु खरंच पाल विषारी असते का, ती दुधात पडली की दूध विषारी होतं का!, साप विनाकारण हानी पोचवतो का, अशा असंख्य प्रश्‍नांची उकल करण्याच्या हेतूने "उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्‍वाबद्दल माहिती देणारा आगळावेगळा अभ्यासक्रम आबासाहेब गरवारे महाविद्यालयात सुरू होत आहे. 

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा प्राणिशास्त्र विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्टरी एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (इनहर) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. बेडूक, देव गांडूळ, साप, सरडे, पाली, मगर, घोरपड, कासव अशा प्राण्यांच्या विश्‍वाची ओळख व्हावी, यासाठी हा अभ्यासक्रम या वर्षीपासून सुरू केला आहे. महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आनंद पाध्ये म्हणाले, ""उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. रंगीत किंवा उडते सरडे असतात, या प्रकारची जैवविविधता आपल्या आजूबाजूला असते. त्याची माहिती लोकांना मिळावी आणि त्या माध्यमातून या प्राण्यांचे संवर्धन व्हावे, हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे.'' 

या अभ्यासक्रमात प्राणिशास्त्रासंदर्भातील किचकट माहिती देण्याऐवजी या प्राण्यांचा अधिवास, प्रजनन काळ, जीवनमान अशी सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेत माहिती देण्यात येणार असल्याचे डॉ. पाध्ये यांनी नमूद केले. जुलैमध्ये सुरवातीपासून अवघे दोन आठवडे हा अभ्यासक्रम चालणार असून, त्यासाठी किमान दहावी पास अशी शैक्षणिक पात्रता आवश्‍यक आहे. दहावी पास असलेल्या कोणत्याही वयोगटातील विद्यार्थी आणि नागरिकांना या अभ्यासक्रमात सहभागी होता येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com