कॉंग्रेसमध्ये भाकरी फिरलीच नाही! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - प्रदेश कॉंग्रेसवर 12 प्रतिनिधी नियुक्त करताना ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि माजी नगरसेविका नीता रजपूत यांची नव्याने नियुक्ती झाली असून, उर्वरित 9 प्रतिनिधी हे पूर्वीचेच आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार कधी, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 

पुणे - प्रदेश कॉंग्रेसवर 12 प्रतिनिधी नियुक्त करताना ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि माजी नगरसेविका नीता रजपूत यांची नव्याने नियुक्ती झाली असून, उर्वरित 9 प्रतिनिधी हे पूर्वीचेच आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार कधी, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 

राज्यातील सर्व जिल्ह्यांतून प्रदेश कॉंग्रेसवर 544 प्रतिनिधी नियुक्त करण्यात येतात. पुणे शहरातील 12 प्रतिनिधींचा त्यात समावेश आहे. या प्रतिनिधींमधून प्रदेश कार्यकारिणी निवडली जाते. प्रदेश प्रतिनिधीसाठी आमदार अनंत गाडगीळ, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड, शिवाजी केदारी, रमेश अय्यर, मनीष आनंद आदींना डावलण्यात आले आहे. तर, पक्षात नवख्या असलेल्या शानी नौशाद यांनाही पक्षश्रेष्ठींच्या आग्रहाखातर प्रदेश कॉंग्रेसवर नियुक्ती मिळाल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 

प्रदेश प्रतिनिधी म्हणून उल्हास पवार, शरद रणपिसे, बाळासाहेब शिवरकर हे 30 वर्षांहून अधिक काळ प्रदेश कॉंग्रेसवर आहेत. रणपिसे तर सध्या विधान परिषदेत गटनेतेही आहेत. एकाच व्यक्तीला तीन पदे कशी दिला जातात? हडपसरमधून कॉंग्रेसचा दुसरा कार्यकर्ता नाही का? उल्हास पवार यांनाच संधी द्यायची, तर अन्य कार्यकर्त्यांनी काय करायचे? असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. कॉंग्रेस सक्षम करताना नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी "सकाळ'कडे व्यक्त केली. 

गंभीर गुन्हा दाखल असूनही पक्षाने रोहित टिळक यांच्यावर पुन्हा विश्‍वास दर्शविला आहे. मोहन जोशी यांनाही प्रदेशचे सदस्यत्व मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली तर, अनंत गाडगीळ यांचा पत्ता ऐनवेळी गुल झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

डॉ. विश्‍वजित कदम सांगलीतून प्रदेशवर 
प्रदेश कॉंग्रेसवर निवडलेल्या प्रतिनिधींची नावे पुढीलप्रमाणे. (कंसात ते ज्या ब्लॉकमधून निवडून आले आहेत, त्याचे नाव) ः 1- उल्हास पवार (पर्वती) 2- अभय छाजेड (मार्केटयार्ड) 3- मोहन जोशी (नेहरू स्टेडियम) 4- बाळासाहेब शिवरकर (हडपसर) 5- शरद रणपिसे (रेल्वे स्टेशन) 6- अरविंद शिंदे (वडगाव शेरी) 7- दीप्ती चवधरी (कोथरूड) 8- रोहित टिळक (कसबा पेठ) 9- रशीद शेख (कॅंटोन्मेंट) 10- नीता रजपूत (भवानी पेठ) 11- कमल व्यवहारे (शिवाजीनगर) 12- आबा बागूल (बोपोडी). प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम सांगलीतून, तर शानी नौशाद यांची भोसरीतून प्रदेश प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान, शहरातील ब्लॉक अध्यक्ष येत्या चार दिवसांत नियुक्त करण्यात येतील, अशी ग्वाही कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.

Web Title: pune news congress