उत्साह, संचलन अन्‌ आनंदाश्रू; 'एसआरपीएफ'चा दीक्षान्त समारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

मिठी अन्‌ सेल्फी
संचलन करणाऱ्या मुलांना पाहताना समारंभास आवर्जून उपस्थित असलेल्या पालकांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूंनी भरून आल्या होत्या. समारंभाची सांगता होताच पालकांनी मुलांना मिठी मारली. मुलांनी हे दुर्मिळ क्षण सेल्फीद्वारे मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले.

पुणे - शिस्तबद्ध संचलन, नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्याचा आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू... अशा उत्साही आणि तितक्‍याच भावनिक वातावरणात राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक एकमधील सत्र क्रमांक 56 चा दीक्षान्त संचलन समारंभ शनिवारी पार पडला.

पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन दलातील 172 प्रशिक्षणार्थी राज्य पोलिस दलाच्या सेवेत रुजू झाले. बी. सी. जगळपुरे यांना दीक्षान्त संचलनाच्या प्रमुखपदाचा बहुमान मिळाला. या वेळी दलाच्या पुणे परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुरेशकुमार मेखला, गट क्रमांक एकचे समादेशक सुनील फुलारी, सहायक समादेशक अनिल कदम, राजेंद्र मोरे, जकीयोद्दीन सय्यद आदी उपस्थित होते.

मेखला म्हणाले, ""या दलामुळे आपण कुटुंबीयांसोबत निवांत राहू शकतो. कायद्याची अंमलबजावणी चांगली होण्यासाठी तुम्हाला सक्षम बनविले आहे.''

"नक्षलवाद्यांना धडकी भरवेल, असे खडतर प्रशिक्षण या प्रशिक्षणार्थींना देण्यात आले आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, संगणक, कायदा, मैदानी चाचणी, योग आदी सराव केला गेला आहे. आजपासून आपण थोडे मुक्त झाला आहात. मात्र, आपण स्वैराचाराकडे झुकता कामा नये,'' असे आवाहन फुलारी यांनी केले.

दरम्यान, 14 प्रशिक्षणार्थींना विशेष प्रावीण्याबद्दल मेखला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पी. व्ही. खुपसे, एम. एस. बढेकर, एम. जी. वाघाये (अंतरवर्ग), व्ही. ए. मोरे, बी. बी. मडके (उत्तम खेळाडू), जगळपुरे, डी. एन. काळे (उत्तम गणवेश), आर. ए. कोळी, डी. ए. हंचनाळे (उत्तम नेमबाज),आर. एम. गायकवाड, आर. टी. घाडगे (उत्तम सांस्कृतिक कला कौशल्य) आदींचा त्यात समावेश आहे.

जगळपुरे यांचे वडील चंद्रकांत जगळपुरे म्हणाले, ""मुलगा विशेष प्रावीण्यासह प्रशिक्षण पूर्ण करणार, याचा विश्‍वास होता. तो रग्बी आणि बास्केटबॉलचा उत्तम खेळाडू आहे. उत्तम उमेदवार म्हणून त्याने पारितोषिक मिळविले, याचा अभिमान आहे.''
भाऊसाहेब मडके म्हणाले, ""पहिल्यापासून दलात भरती होण्याचे स्वप्न होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हा दिवस पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला आहे.'' सीताराम नरके आणि दत्तात्रेय निकम यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र केंडे यांनी आभार मानले.

मिठी अन्‌ सेल्फी
संचलन करणाऱ्या मुलांना पाहताना समारंभास आवर्जून उपस्थित असलेल्या पालकांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूंनी भरून आल्या होत्या. समारंभाची सांगता होताच पालकांनी मुलांना मिठी मारली. मुलांनी हे दुर्मिळ क्षण सेल्फीद्वारे मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले.

Web Title: Pune news Convocation of SRPF

टॅग्स