नगरसेवकांच्या मानधनासाठी विकासकामांवर संक्रांत

मंगेश कोळपकर
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे - महापालिकेच्या १६७ नगरसेवकांना दर महिन्याला मानधन देण्यासाठी प्रशासनाकडे निधी शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे विकासकामांसाठी राखून ठेवलेल्या निधीला कात्री लावून त्यातील तूर्त १ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम मानधनासाठी वळवावी लागणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम घाईत सुरू आहे. यापुढे जवळपास पाच कोटी रुपये नगरसेवकांच्या मानधनासाठी दर वर्षाला लागणार आहेत.

नगरसेवकांना दरमहा साडेसात हजार रुपये मानधन देण्याचा आदेश सरकारने २०१० मध्ये दिला होता. त्यानंतर त्‍यात वाढ झाली नव्हती; मात्र १५ जुलै २०१७ पासून राज्यातील सर्वच महापालिकांतील नगरसेवकांचे दरमहा मानधन २० हजार रुपये करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला. त्यामुळे प्रशासनाने १ ते १५ जुलैदरम्यानचे साडेसात हजार रुपयांच्या हिशेबाने तर १६ ते ३१ जुलैचे २० हजार रुपयांप्रमाणे मानधन दिले. मानधनासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते; परंतु मानधनाची रक्कम वाढल्यामुळे प्रशासनाकडून वार्षिक तरतूद संपून गेली.

यापूर्वी मानधन धनादेशाद्वारे दिले जात होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून प्रशासनाकडून ते थेट नगरसेवकांच्या बॅंक खात्यात (आरटीजीएस) जमा केले जाते. काही नगरसेवकांचे बॅंक खाते क्रमांक उपलब्ध न झाल्यामुळे काही नगरसेवकांचे मानधन थकले, तर डिसेंबरचे मानधन जमा करण्यासाठी प्रशासनाकडे रक्कमच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे नगरसचिव सुनील पारखी यांनी आयुक्तांना पत्र पाठवून नगरसेवकांना ३१ मार्चपर्यंत मानधन देण्यासाठी एक कोटी ७५ लाख रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

४ कोटी ८० हजार हवेत! 
विकासकामांसाठी राखून ठेवलेल्या निधीतून आता तूर्त सुमारे पावणेदोन कोटी रुपये मानधनावर खर्च होणार आहेत, तर दरमहा मानधन देण्यासाठी ३३ लाख ४० हजार रुपये लागणार आहेत. त्यामुळे वर्षासाठी मानधनावर ४ कोटी ८० हजार रुपये खर्च होणार आहेत. 

प्रस्‍ताव लवकरच स्‍थायीकडे
मानधनासंदर्भात मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांच्या कार्यालयाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत तो स्थायी समितीकडे जाईल, अशी अपेक्षा असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Web Title: pune news corporator honorarium development work issue