न्यायालयाच्या धाकाने पित्याला "आधार' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे - दोन्ही मुले व्यवस्थित सांभाळ करत नव्हती... मग पित्याने कायद्याचा आधार घेत त्यांच्याकडून प्रत्येकी सहा हजार रुपये पोटगी मिळविण्याचा आदेश न्यायालयाकडून मिळविला... तरीही मुलांकडून रक्कम मिळाली नाही... अखेर या दोघांविरुद्ध न्यायालयाने वॉरंट जारी केले... त्यानंतर त्यांनी वडिलांचा सांभाळ करू ! असा "शब्द' न्यायालयास दिल्याने ऐंशी वर्षांच्या वृद्धाने अखेर पोटगीचा दावा मागे घेतला आहे. 

नोकरी अन्‌ कष्ट करून या गृहस्थाने दोन्ही मुलांचा सांभाळ केला. त्यांना नोकरी मिळाली, त्यांचे लग्न झाले. बारा वर्षांपूर्वी या गृहस्थाच्या पत्नीचे निधन झाले. दोन्ही मुले आणि सुनांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत होती. मानसिक त्रासाला कंटाळल्याने त्यांनी कौटुंबिक न्यायालयात दाद मागितली. दोन्ही मुलांच्या विरोधात हिंदू विवाह कायद्यातील कलम 24, 26 आणि भारतीय दंड विधान कलम 125 नुसार दावा दाखल केला. उपजीविकेसाठी मुलांकडून पोटगी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने त्यांची बाजू ग्राह्य मानून त्यांच्या बाजूने निकाल दिला. दोन्ही मुलांनी प्रत्येकी सहा हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. 

तरीही तीन वर्षांपासून या मुलांनी वडिलांना एक रुपयाही मदत केली नाही. उलट, त्यांना घराबाहेर काढले. त्यामुळे घराच्या जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांना राहावे लागत होते. त्याचप्रमाणे उपजीविकेसाठी इतरांकडे मदत मागावी लागत होती. उपजीविकेचे साधन नसल्याने या गृहस्थाने पुन्हा एकदा न्यायालयाचे दार ठोठावले. ऍड. हेमंत झंजाड, ऍड. नितीन झंजाड यांच्या मदतीने न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही मुलांना "वॉरंट' जारी केले. परिणामी, दोन्ही मुले न्यायालयात हजर झाली. न्यायालयाने त्यांना जाब विचारला, त्या वेळी झालेली चूक लक्षात आल्याने त्यांनी वडिलांचा सांभाळ करू, असे न्यायालयात लिहून दिले. त्यामुळे त्या गृहस्थाने मुलांविरुद्ध दाखल केलेला दावा मागे घेतला. आता सर्व जण एकत्रितपणे राहत आहेत. 

Web Title: pune news court

टॅग्स