खंडणीबहाद्दर अब्दुल गनी खान टोळीवर मोका; चौघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे  - व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळणारा सराईत गुन्हेगार अब्दुल गनी खान याच्यासह टोळीतील चौघांविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

पुणे  - व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळणारा सराईत गुन्हेगार अब्दुल गनी खान याच्यासह टोळीतील चौघांविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

अब्दुल गनी खान (वय 34), अक्षय राजेश नाईक (वय 28, दोघे रा. घोरपडे पेठ), अक्रम नासिर पठाण (वय 27, रा. औंध डीपी रस्ता) आणि अक्षय अंकुश माने (वय 23, रा. घोरपडे पेठ) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल गनी खान याने स्वत:ची टोळी तयार करून साथीदारांच्या मदतीने खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा अशा स्वरूपाचे दहा गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीतील गुन्हेगार हे खडक परिसरातील व्यावसायिकांना धमकावून खंडणी वसूल करीत होते. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्‍त डॉ. बसवराज तेली यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे, कर्मचारी सरफराज शेख, महेश बारवकर, महेश कांबळे आणि अनिकेत बाबर यांनी मोकाचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त (दक्षिण) रवींद्र सेनगावकर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांनी अब्दुल गनी खान या टोळीवर मोका कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला आणि सहआयुक्‍त रवींद्र कदम यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास सहायक आयुक्‍त बाजीराव मोहिते करीत आहेत. 

घोरपडे पेठेत नजमा इसाक शेख या ज्येष्ठ महिलेचा चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही टोळी त्यांच्याकडून दर महिन्याला हप्ता घेऊन जात होती. महिलेच्या मुलाने हप्ता देण्यास नकार दिल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली होती. इम्रान अफजल शेख या व्यावसायिकाला 25 हजार रुपये खंडणी मागितली होती. मात्र, त्यांनी खंडणी न दिल्यामुळे या टोळीने 20 जून रोजी शेख यांना लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपींनी महेबूब अल्लाना यांच्या भावाचे अपहरण करून 50 हजार रुपये खंडणी घेतली होती. तसेच, लता ताटे या महिलेचे घर बळकावण्याचा प्रयत्न केला होता. 

- अब्दुल गनी खान याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्यासह दहा गुन्हे. 
सन 2002 मध्ये दोन वर्षांसाठी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार. 
- अक्षय नाईक याच्याविरुद्ध खंडणी, खुनाचा प्रयत्न याच्यासह चार गुन्हे. 
सन 2012 मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार. 
- अक्रम पठाण याच्यावर खंडणी, घरफोडीसह चार गुन्हे. 
- अक्षय माने याच्याविरुद्ध खंडणी, चोरी, गंभीर दुखापतीचे नऊ गुन्हे. 

Web Title: pune news crime Abdul Ghani Khan