घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे  - शहरातील बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करणाऱ्या बंटी-बबली या जोडीसह त्यांच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून घरफोडीचे दहा गुन्हे उघडकीस आणून पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. 

पुणे  - शहरातील बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करणाऱ्या बंटी-बबली या जोडीसह त्यांच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून घरफोडीचे दहा गुन्हे उघडकीस आणून पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. 

आकाश हेमराज परदेशी (वय 25, रा. येरवडा), अनिल काशिनाथ लष्करे (28, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी) आणि उषा राम कांबळे (25, रा. येरवडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी अलंकार, कोथरूड, वारजे माळवाडी, विमानतळ, विश्रांतवाडी, निगडी आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे दहा गुन्हे केले आहेत. शहरात घरफोडीच्या घटना वाढल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरात गस्त वाढवून गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले होते. युनिट एकचे कर्मचारी गजानन सोनुने आणि अशोक माने यांना सराईत गुन्हेगार आकाश परदेशी हा येरवडा परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने त्याची मैत्रीण उषा कांबळे आणि अनिल लष्करे यांच्यासमवेत शहरात घरफोड्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी उषा कांबळे आणि अनिल लष्करे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. 

आरोपींच्या ताब्यातून 162 ग्रॅम सोन्याचे दागिने, 590 ग्रॅम चांदीच्या वस्तू, दुचाकी आणि एलईडी जप्त केले आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, कर्मचारी प्रकाश लोखंडे, राजू पवार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. 

जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा घरफोड्या 
तिघेही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. परदेशी याच्याविरुद्ध 27 गुन्हे, उषा कांबळे हिच्याविरुद्ध 16 गुन्हे आणि लष्करे याच्यावर घरफोडीचे आठ गुन्हे दाखल आहेत. ते डिसेंबर महिन्यात कारागृहातून जामिनावर सुटले होते. त्यांनी पुन्हा घरफोड्या करण्यास सुरवात केली. ते सोलापूर येथून येऊन शहरात घरफोड्या करत असल्याचे उपायुक्‍त पंकज डहाणे यांनी सांगितले.

Web Title: pune news crime Burglary