तरुणीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिने आरडा-ओरडा केला.

पुणे : कुटुंबीयांच्या विरोधामुळे लग्नास नकार देणाऱ्या तरुणीच्या गळ्यावर वार करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तरुणी झोपेत असतानाच तिच्यावर वार करून आरोपीने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सहकारनगर येथील सागर लॉजमध्ये रविवारी सकाळी घडली. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

शरद चंद्रकांत जगदाळे (वय 29, रा. तेर, जि. उस्मानाबाद) व 21 वर्षांची तरुणी हे दोघेही जखमी आहेत. जगदाळे हा उस्मानाबाद येथे मोबाईलच्या दुकानात नोकरीला आहे, तर तरुणी पुण्यात नोकरी करते. त्या दोघांचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते व त्यांना लग्न करायचे होते. मात्र, कुटुंबीयांचा लग्नाला विरोध असल्यामुळे ती तरुणी विवाहास नकार देत होती.

जगदाळे याचा शनिवारी वाढदिवस होता. त्यामुळे त्याने तरुणीला फोन केला आणि "तू लग्न करणार नाहीस पण एकदा भेट', अशी विनंती केली. तरुणीने भेटण्यास होकार दिल्यानंतर जगदाळे पुण्यात आला. शनिवारी रात्री आठ वाजता दोघेही भेटले व सहकारनगरमधील सागर लॉजमध्ये भाड्याने खोली घेतली. जेवण करून ते दोघे तिथेच झोपले. रविवारी सकाळी सातच्या सुमारास जगदाळे झोपेतून उठला. लग्नाला नकार मिळाल्याचा मनात राग असल्याने त्याने झोपेत असलेल्या प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वतःच्या पोटात चाकू खुपसून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिने आरडा-ओरडा केला. त्यामुळे लॉजमधील कामगार धावत आले. त्यांनी दोघांनाही भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी जगदाळे याचा जबाब नोंदविला असून दोघांच्याही नातेवाइकांना माहिती कळविण्यात आली आहे.

Web Title: pune news crime man attacks girlfriend, attempts suicide