चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून निर्घृण खून 

संदीप जगदाळे
बुधवार, 14 मार्च 2018

दोनच दिवसांपूर्वी त्याने पत्नीला माहेरहून राहत्या घरी पुन्हा नांदवण्यासाठी घेऊन आलेला होता मध्यरात्री या दोघांमध्ये पुन्हा भांडणे झाली. मी माहेरी निघून जाणार आहे अशी पत्नीने धमकी दिल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील हातोडा मारला

हडपसर - चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून व दोरीने गळा आवळून निर्घूण खून केल्याची घटना हडपसर येथे घडली. या प्रकरणी पत्नीचा खून करून पसार झालेल्या पतीला हडपसर पोलिसांनी अटक केलेली आहे. ही घटना वेताळबाबा वसाहत, पुणे सासवड रोड येथे मंगळवारी मध्यरात्री घडली.

रेणुका संजय पवार (वय ३१) असे मयत महिलेचे नाव आहे तिचा पती आरोपी संजय अर्जुन पवार (वय ३४) दोघेही राहणार वेताळबाबा वसाहत येथे राहत होते. यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी झालेला होता. त्यांना एक सहा वर्षांचा मुलगा आहे. नारी गाव, तालुका बार्शी, जिल्हा उस्मानाबाद असे आरोपीचे मुळगाव आहे. आरोपी एका दगड कारखान्यात कामाला होता. तो कामानिमित्त या ठिकाणी राहावयास होता.  

पत्नी वारंवार भांडणे करून माहेरी जाते याचा राग पतीला होता.पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत होती. दोनच दिवसांपूर्वी त्याने पत्नीला माहेरहून राहत्या घरी पुन्हा नांदवण्यासाठी घेऊन आलेला होता मध्यरात्री या दोघांमध्ये पुन्हा भांडणे झाली. मी माहेरी निघून जाणार आहे अशी पत्नीने धमकी दिल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील हातोडा मारला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात  पडलेली पाहून त्याने पुन्हा दोरीच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केला. व तेथून पसार झाला. हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्याच्या वर खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

Web Title: pune news: crime murder police