सायबर क्राइमला रोखण्यासाठी होऊया सज्ज 

अनिल सावळे
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

इंटरनेट सुविधा आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. किशोरवयीन मुले अनवधानाने आणि अपुऱ्या माहितीमुळे सायबर गुन्ह्यांत अडकत आहेत. त्यासाठी मुले- मुली आणि पालकांनीही वेळीच योग्य खबरदारी घेतल्यास भविष्यात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून शाळा- महाविद्यालयांत "वुई फाइट सायबर क्राइम' हे अभियान राबविले जात आहे, ही बाब निश्‍चितच समाधानकारक आहे. 

सध्या सायबर नेट, सायबर क्राइम, सायबर सिक्‍युरिटी असे शब्द सर्रास ऐकायला मिळतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसोबतच आता स्मार्टफोन आणि इंटरनेट ही प्रत्येकाची गरज बनली आहे. माफक दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्यामुळे संपूर्ण विश्‍व जवळ आले आहे. बॅंकिंग व्यवहार, बस, रेल्वे, विमान प्रवासाची तिकिटे, कपडे, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाइन खरेदी वाढली आहे. गुगल, फेसबुक, ऍमेझॉन, ट्‌विटरवर तरुणाईच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकही ऑनलाइन आहेत. इंटरनेट युजर्सची संख्या वाढल्याचे फायदे दिसून येत आहेत; तसेच तोटेही नागरिकांना सहन करावे लागत आहेत. 

लग्न जुळविण्यासाठी मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी केली जाते. त्यातून लग्नाच्या आमिषाने, तसेच ऑनलाइन खरेदी करताना किंवा डेबिट- क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. संगणक, इलेक्‍ट्रॉनिक साधने आणि इंटरनेटच्या मदतीने होणाऱ्या या गुन्ह्यांना सायबर क्राइम असे संबोधले जाते. अशा सायबर गुन्ह्यांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक भरडले जात आहेत. डिजिटल शिक्षण, आरोग्य, सरकारी यंत्रणा आणि व्यवसायवृद्धीसाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे. सोशल मीडियावर जास्तीत जास्त मित्र असणे हे "स्टेटस सिम्बॉल' मानले जात आहे. परंतु नवीन मित्र होत असताना किंवा सोशल मीडियावर एकमेकांवर कुरघोडी करीत असताना मुलांच्या हातून सायबर गुन्हे घडत असल्याचे दिसून येत आहे. बदला घेण्यासाठी फेक प्रोफाइल तयार करून एखाद्या व्यक्‍तीची बदनामी करून मानसिक त्रास दिला जातो. त्याला कायद्याच्या भाषेत "आयडेन्टीफाय थेफ्ट' असे म्हटले जाते. अशा गुन्ह्यांत गुन्हेगार आणि पीडित यांच्यात किशोरवयीन मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे सायबर गुन्हे शाखेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. आपण जे कृत्य केले तो गुन्हा आहे याबाबत ही मुले अनभिज्ञ असतात. काही मुले- मुली मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून स्वतःची आक्षेपार्ह छायाचित्रे शेअर करतात. पुढे ती छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देतात. त्याला "सायबर बुलिंग' असे म्हटले जाते. तसेच, वैयक्‍तिक बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावरील एखाद्या व्यक्‍तीचे छायाचित्र घेऊन त्याला अश्‍लील छायाचित्र जोडून ते खरे छायाचित्र असल्याचे भासविले जाते. त्याला सायबरच्या भाषेत "मॉर्फिंग' म्हणतात. किशोरवयीन मुले त्यांना योग्य समज नसल्यामुळे कोणाच्या संपर्कात किती राहावे, सोशल मीडियावर कोणाशी काय शेअर करावे याबाबत अनभिज्ञ असतात. मात्र, गुन्हा घडल्यानंतर त्यांच्यासह कुटुंबीयांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. काही घटनांमध्ये मुले- मुली इंटरनेटचा वापर करताना "सायबर प्रिडेटर'च्या जाळ्यात अडकतात. आर्थिक आणि लैंगिक शोषण करण्याच्या शोधात असलेल्या व्यक्‍ती त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या मुला- मुलींचे शोषण करून ब्लॅकमेलिंग करतात. मुलांना भीती घालून अश्‍लील कृत्य करवून ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. बाल लैंगिकता माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा आहे. सध्या अनेक शाळांमध्ये इंटरनेटच्या सुरक्षित वापरासाठी प्रशिक्षण देऊन जागरूकता निर्माण केली जात आहे. मुलांमध्ये सायबर सिक्‍युरिटीविषयी जागृती करण्याबाबत पालक बऱ्याचदा अनुत्साही दिसून येतात. 

सायबर गुन्हे शाखेच्या सर्वेक्षणानुसार, 14 ते 16 वर्षे वयोगटातील 15 टक्‍के पालक सुरक्षित इंटरनेटबाबत आपल्या मुलांसोबत संवाद साधतात. तर, 16  ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे 14 टक्‍के पालक मुलांशी संवाद साधत नसल्याचे आढळून आले आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, सह आयुक्‍त रवींद्र कदम यांच्यासह आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राधिका फडके आणि त्यांची संपूर्ण टीम, तसेच "करिअर कॉर्नर'चे ऋषीकेश हुंबे आणि "गुगल इंडिया'चे अधिकारी "वुई फाइट सायबर क्राइम' या अभियानाद्वारे शाळा- महाविद्यालयांत जाऊन हे गुन्हे रोखण्याबाबत जागृती करीत आहेत. शिक्षक- प्राध्यापकही त्यासाठी पुढाकार घेत आहेत, ही समाधानाची बाब आहे. 

गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना- 
पालकांनी घ्यावयाची खबरदारी- 
- मुलांनी वापरण्याचा संगणक घरात पालकांचे लक्ष राहील, अशा ठिकाणी ठेवावा. 
- संगणक आणि वायफायचा पासवर्ड पालकांनाही माहीत असावा. 
- पालकांना तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती असावी, जेणेकरून मुले इंटरनेटवर काय करतात यावर नियंत्रण ठेवता येईल. 
- सोशल मीडियावर कोणाशी मैत्री करावी, याची माहिती द्यावी. 
- ऑनलाइन ओळख असलेल्या मित्रांना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी पालकांना कल्पना असावी. 

मुला-मुलींनी घ्यायची खबरदारी- 
- मुलांनी आपल्या इंटरनेट खात्यांना योग्य पासवर्ड टाकावा. 
- इंटरनेटवर टाकण्यात येणारी माहिती, छायाचित्रे ही कायमस्वरूपी त्यावर राहणार आहेत, याची जाणीव असावी. 
- सोशल मीडियावर अनोळखी व्यक्‍तीसोबत मैत्री करू नये किंवा त्यांना खासगी माहिती सांगू नये. 
- सोशल मीडियावरील सर्व माहिती खरीच असते असे नाही, त्यामुळे ती पुढे पाठविताना विचार करावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news cyber crime