तुम्ही फक्त ‘लढ’ म्हणा... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

मित्रहो, नमस्कार! 
तुमच्या घरातल्या बाप्पालाही माझा नमस्कार! 
मी डी. एस. कुलकर्णी...तुमचा डीएसके. 

मित्रहो, नमस्कार! 
तुमच्या घरातल्या बाप्पालाही माझा नमस्कार! 
मी डी. एस. कुलकर्णी...तुमचा डीएसके. 

मागच्या आठवड्यात श्री. अभिजित पवारांचा फोन आला आणि मनाला नवी ऊर्जा मिळाली. मी पुण्यातल्या मध्यमवर्गीय घरात जन्मलो, वाढलो. फक्त नोकरी न करता उद्योग करत राहिलो तेही वयाच्या आठव्या वर्षापासून. पण...कधीच, कुणाला फसविण्याचा विचारही मनात आला नाही. कारण मध्यमवर्गीयांचा तो पापभीरूपणा माझ्याही अंगात आहेच. तसेही रक्तातले संस्कार पुसता थोडेच येतात? लहानपणी भाजी, लॉटरी, वर्तमानपत्रं...काही ना काही विकतच मोठा झालो. पण पैशांपेक्षाही माणसं कमाविण्यातला आनंद खूप मोठा वाटायचा. त्यातूनच मी माणसं जोडत गेलो आणि उद्योगही वाढत गेला. 

उद्योगाची गणितं समजली तरीही मी मात्र माझं गणित वेगळंच मांडलं. एक तर जगावेगळ्या गोष्टी करण्याची ऊर्मी माझ्यात आहेच. जिथं कुणी पाऊल टाकलं नाही, तिथं मी पाय रोवून उभा राहिलो. मनात आणलं तर एक मराठी माणूस उद्योगात किती मोठी भरारी घेऊ शकतो याचं उदाहरण जगाला दाखवलं. पण हे सगळं मी एकट्यानं केलं नाही, तर माझ्या मराठी मध्यमवर्गीयांना सोबत घेऊन केलं. मलाही दोन-चार भागीदारांसमवेत उद्योग करता आला असता. पण माझ्या उद्योगातला फायदा दोन-चार जणांना होण्यापेक्षा, ज्याने मला मोठं केलं, त्या माझ्या मराठी समाजाला का देऊ नये, हाच त्यामागचा विचार. मग ज्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला, तो सार्थ करत...त्यांचाही दुप्पट-तिप्पट अगदी चौपट फायदाही करून दिला. कोणत्याही उद्योगात चढ-उतार असतातच. तरीही गेली ३५-४० वर्षे चेकची तारीख चुकली नाही. सध्याच्या मंदीच्या परिस्थितीत आणि माझ्या जीवघेण्या अपघातानंतर...गेल्या अवघ्या वर्षभरात...या पैशानं मात्र विश्‍वासाला संशयाच्या भोवऱ्यात टाकलं. 

तसा हा भोवरा नैसर्गिक नाहीच. कुणीतरी उठविलेल्या वावड्यांनी तयार झालेला हा भोवरा. जे मला अनेक वर्षांपासून ओळखतात, असे लोक या भोवऱ्यात सापडणं शक्‍यच नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या अशा या मित्रांची संख्या हजारोंच्या घरात आहे. यात महाराष्ट्राच्या विदर्भ, परभणी, नांदेडसारख्या भागातून...ज्यांचा माझ्याशी व्यावहारिक संबंध नाही...असेही अनेक मित्र आहेत. नाशिक, नागपूर, कोल्हापूर...संपूर्ण महाराष्ट्रातून...देशभरातून तसेच इंग्लंड, अमेरिका, दुबई अशा विदेशातूनही लोक मला पाठिंबा देत आहेत. आर्थिक अडचणीतून आज जात असताना, मी कमावलेलं हे मैत्रीचं धन माझ्या गाठीशी आहे. म्हणून मी उभा आहे. 

आजमितीस माध्यमांना हाताशी धरून आरोप करून प्रसिध्दी मिळवणं सोपं आहे. परंतु ज्यांना कोणाला हे आरोप करायचे होते, त्यांनी त्याबद्दल मला विचारलं असतं तरी मी कागदपत्रांनिशी त्यांना सगळं सांगितलं असतं...आजही सांगायला तयार आहे. पण हे आरोप होत असतानाही...संयमानं आणि शांतीनं...अडचण सोडविण्याकडे, मी लक्ष देऊ शकतो, ते तुम्हां सर्वांच्या या प्रेमाच्या बळावरच ! हा उद्योगसमूह एका रात्रीत उभा राहिलेला नाही. तर त्यामागे कष्ट, प्रेम, विश्‍वास आणि प्रामाणिकता...ही सारी मूल्ये आहेत. प्रत्येकाचा एकेक रुपया परत दिल्याशिवाय मलाही शांत झोप मिळणार नाही. त्यासाठी वेळ लागेल. पण तोपर्यंत मीही स्वस्थ बसणार नाही. अडचणीत आलेल्या उद्योजकाला (त्यातूनही मराठी उद्योजकाला)आपल्या जाळ्यात कसे फसवता येईल याचीही अनेक उदाहरणे मी आता देऊ शकतो. त्यामुळेच आज अभिजित पवार आणि त्यांच्या दै. ‘सकाळ’च्या सर्व टीमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. 

त्यातूनही कायद्याच्या चौकटीवर उद्या कोणी मला नेऊन उभं केलं तरी...मित्रहो, तुमच्या मनातला माझ्याबद्दलचा विश्‍वास ढळू देऊ नका. एवढंच मला सांगावंसं वाटतं. दै. ‘सकाळ’सारखे सुजाण मराठी वृत्तपत्र आणि तुम्ही सारे मराठी बांधव-भगिनी यांच्या प्रेमाच्या बळावर ही लढाई मी जिंकेनच ! कारण माझ्यामते खरी लढाई पैशांची नाही...तर आयुष्यभर जपलेल्या मूल्यांची, तत्त्वांची लढाई आहे. ती जिंकायलाच हवी ! तुम्ही फक्त ‘लढ’ म्हणा... 

Web Title: pune news D. S. Kulkarni