कोंडकेंच्या चित्रपटांचा अभ्यास व्हावा - मल्हार अरणकल्ले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

भोर तालुक्‍यातील इंगवली गावात दादा कोंडके यांचे स्मारक उभे करण्याचा संकल्प करताना मला अभिमान वाटत आहे. या स्मारकाचे काम ज्येष्ठ नेपथ्यकार - कलादिग्दर्शक श्‍याम भुतकर करणार आहेत. यासाठी अनेकांचा मानसिक, आर्थिक सहभाग आवश्‍यक आहे. 
- मनोहर कोलते, प्रमुख विश्‍वस्त, दादा कोंडके मेमोरिअरल फाउंडेशन 

पुणे - चित्रपट दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या नियोजित स्मारकाबरोबरच त्यांचे चित्रपट, त्यातील भाषा, त्यांचा अस्सल मराठमोळेपणा अशा अनेक मुद्द्यांचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी व्यक्त केले.

दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनने आयोजित केलेल्या दादा कोंडके स्मृतिदिन समारंभात ते बोलत होते. दादांच्या इंगवली (ता. भोर) या मूळ गावी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा संदर्भ घेऊन अरणकल्ले म्हणाले, ‘‘दादांच्या चित्रपटांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर माणसांना जगण्याची नवी दृष्टी दिली. त्यांचे नियोजित स्मारक हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरावा.’’   

महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते म्हणाले, ‘‘आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राला भरभरून हसविले आणि दादांनी त्यांचा वारसा पुढे नेला आहे. या दोघांमध्ये साम्य होते. दादांच्या नियोजित स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत.’’ 

त्रिदल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश देसाई, दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनचे प्रमुख विश्‍वस्त मनोहर कोलते, सचिव डॉ. राजेद्र भवाळकर, खजिनदार विक्रम जाधव, परशुराम शेलार आदी पस्थित होते. याप्रसंगी नगरचे उपजिल्हाधिकारी डॉ. विक्रम बांदल, जिल्हा पोलिस उपअधीक्षक पौर्णिमा बांदल आणि धनुर्विद्या खेळाडू यश बारगुजे यांचा सत्कार करण्यात आला. बांदल पती- पत्नी हे इंगवली येथील आहेत. झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाचा वसा देण्याचे काम करणारी सामाजिक संस्था ज्ञान फाउंडेशनचा या वेळी प्रारंभ करण्यात आला.

Web Title: pune news dada kondake movie study malhar arankalle