हिमालयावर सायकल ‘स्वारी’ची तपपूर्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - अंग गोठविणारी थंडी... उंच पर्वतरांगामधील वळणावळणाचे, ओलसर रस्ते... समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचीवर असल्याने विरळ होत जाणारा प्राणवायू... अशा खडतर परिस्थितीशी झुंज देत हिमालयाच्या पर्वतांवर एक दोन नव्हे, तर तब्बल अकरा वर्षे सायकलद्वारे चढाई करण्याची अद्‌भुत किमया साध्य केली आहे दत्तात्रय पाटील यांनी. त्यांच्या सांगली ते शिमला या अनवाणी सायकल प्रवासाची यंदा तपपूर्ती होत आहे. 

पाटील हे मूळचे सांगली येथील असून ते २८ सप्टेंबर ते सात ऑक्‍टोबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. हा प्रवास ते सायकलद्वारे करत करत आहेत. पुण्यातील मुक्कामादरम्यान येरवडा येथील गुरुकुल शाळेतील मुलांना त्यांनी भेट देत पर्यावरण संरक्षणासाठी सायकलचा वापर वाढविण्याचा संदेश दिला.  पाटील म्हणाले, ‘‘लहानपणापासूनच सायकलविषयी खूप आवड होती. शाळेत असताना एका सायकल स्पर्धेमध्ये सहभागी झालो आणि प्रथम क्रमांक मिळविला. यातून हळूहळू आवडीचे ‘पॅशन’मध्ये रूपांतर झाले. लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असताना एकदा या ‘एमटीबी हिमालया सायकल स्पर्धे’बाबत माहिती मिळाली. त्यात सहभागी होण्याचे ठरविले. तेथील वातावरण थंड असते, ऑक्‍सिजन कमी असतो आणि रस्ते अवघड असतात. एवढीच माहिती होती. परंतु प्रत्यक्षात अनुभव याहीपेक्षा भयानक होता. क्षणाक्षणाला बदलते वातावरण, अधूनमधून पडणारा बर्फ, ओलसर रस्ता अशा वेळी थोडीशी चूकही जीवावर बेतते. मात्र जिद्दीने यासर्वांवर मात केली. प्रत्येक वेळी एक वेगाळीच अनुभूती या स्पर्धेतून मिळत असते. या भन्नाट अनुभवामुळेच आजही ही मला स्पर्धा खुणावत असते.’’

शेतीचे काम अन्‌ स्पर्धेचा ध्यास
या स्पर्धेसाठी जगभरातील शेकडो स्पर्धक महिनाभर आधीच शिमला येथे दाखल होत असतात. अनेक स्पर्धकांना यासाठी कंपन्यांकडून प्रायोजकत्व दिले जाते. मात्र पाटील यांना कोणतेही प्रायोजकत्व मिळत नाही. वर्षभर शेतीची कामे आणि सायकल प्रशिक्षणातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच ते आपली ही हौस भागवतात. २०१० आणि २०११मध्ये त्यांनी स्पर्धेचे उपविजेते पद पटकाविले आहे. 

Web Title: pune news datta patil cycle