रेल्वे प्रवाशांना बेदम मारहाण करणारे 11 तरुण अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

दौंड : दौंड लोहमार्ग पोलिसांनी कुर्डुवाडी ते पारेवाडी (जि. सोलापूर ) दरम्यान रेल्वे प्रवासात महिला व मुलांसह एकूण सोळा जणांना काठ्या व केबलने बेदम मारहाण करणार्या 11 आरोपींना अटक केली आहे.
आरोपी हे रेल्वेगाड्यांमध्ये अवैधरित्या खाद्यपदार्थ विकणारे तरूण असल्याची माहिती पुढे आली आहे.

दौंड : दौंड लोहमार्ग पोलिसांनी कुर्डुवाडी ते पारेवाडी (जि. सोलापूर ) दरम्यान रेल्वे प्रवासात महिला व मुलांसह एकूण सोळा जणांना काठ्या व केबलने बेदम मारहाण करणार्या 11 आरोपींना अटक केली आहे.
आरोपी हे रेल्वेगाड्यांमध्ये अवैधरित्या खाद्यपदार्थ विकणारे तरूण असल्याची माहिती पुढे आली आहे.

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अंमलदार राजकुमार बाफना यांनी आज (ता. 30) या बाबत माहिती दिली. भीमराव लक्ष्मण भोसले (वय 43) व त्यांच्या पत्नी प्रेमा भोसले (वय 35, दोघे रा. इंदिरा वसाहत, गणेशखिंड रोड, औंध, पुणे ) या प्रकरणात गंभीररित्या जखमी झाले आहेत. भीमराव भोसले हे माढा येथील एका विवाहसोहळ्यास उपस्थित राहून काल (ता. 29) दुपारी सोलापूर - पुणे पॅसेंजरने पुण्याकडे निघाले होते. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर पॅसेंजर उभी असताना भोसले यांच्या कुटुंबातील एका दहा वर्ष वय असलेल्या मुलीचा एका अज्ञात महिलेच्या पिशवीला चुकून पाय लागला. त्यावरून सदर महिलेने त्या मुलीच्या कानफाडात जोराने मारल्याने भोसले कुटुंबीयांनी जाब विचारला. त्यावर महिलेने " थांबा एका - एकाला दाखविते ",असे म्हणत मोबाईलद्नारे काही तरूणांना पारेवाडी रेल्वे स्थानकावर बोलावून घेतले. पॅसेंजर पारेवाडी येथे आल्यानंतर 20 ते 22 तरूणांनी डब्ब्यात प्रवेश करीत हातातील काठ्या, रॉड, केबल, आदींनी महिला व मुलांसह सर्वांना बेदम मारहाण केली. प्रतिकार करणार्या महिलांना देखील या टोळक्‍याने लाथा - बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

त्यानंतर भोसले कुटुंबीयांनी नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून पोलिसांना माहिती दिली. पॅसेंजर दौंड रेल्वे स्थानकावर रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी दाखल झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांचे एक पथक रेल्वे स्थानकावर गेले व त्यांनी आरोपींविषयी माहिती घेतली. ठाणे अंमलदार संजय पाचपुते यांनी रात्री गुन्हा दाखल करून घेतला. पोलिस निरीक्षक डी. एम. बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक पारेवाडी येथे रवाना झाले आणि त्यांना माहिती घेत आरोपींना आज पहाटे ताब्यात घेतले. जावेद अजीज शेख (वय 23), महावीर ज्ञानदेव साळवे (वय 27) ,सुनील बंडू भोसले (वय 20) , गणेश सुनील नगरे (वय 20) , महादेव प्रकाश ढवळे (वय 20) , सागर अर्जुन शिंदे (वय 22) , पद्मेश शिवराम नगरे (वय 22) , अशोक बाळासाहेब साळवे (वय 32) , गणेश भगवान शेलार (वय 19) , पैगंबर अलाउद्दीन तांबोळी (वय 23) आणि विशाल शिवराम नगरे (वय 30, सर्व रा. पारेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) या अकरा आरोपींना अटक करण्यात आली. मात्र मोबाईल करून तरूणांना बोलावणारी महिला फरार झाली आहे.
दौंड येथे या अकरा आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर गुन्हा पुढील तपासासाठी कुर्डुवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्याचा फोटो काढणारा निघाला आरोपी...
पारेवाडी येथून आणलेल्या आरोपींना भेटण्यासाठी आज सकाळी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात एक जण आला होता. तो मोबाईल मधून पोलिस ठाण्याचे फोटो काढत असताना राजकुमार बाफना यांनी त्यास आत बोलावून फोटो प्रकरणी जाब विचारला. तो विसंगत उत्तरे देऊ लागल्याने त्याला पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर त्याने बोलता - बोलता " मी पण आहे ना यांच्याबरोबर ..."अशी अप्रत्यक्ष कबुली दिल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले.

Web Title: pune news daund railway 11 miscreants arrested