डेंगीचा संभाव्य धोका वाढतोय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

पावसानंतरही महापालिकेची यंत्रणा सक्रिय नसल्याचे स्पष्ट

पुणे - पावसाला सुरवात होऊन महिन्यानंतरही डासांचा बंदोबस्त करणारी महापालिकेची यंत्रणा सध्या सक्रिय नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. जागोजागी साचलेले पाणी, त्यातून होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीतून डेंगीचा संभाव्य धोका वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

पावसानंतरही महापालिकेची यंत्रणा सक्रिय नसल्याचे स्पष्ट

पुणे - पावसाला सुरवात होऊन महिन्यानंतरही डासांचा बंदोबस्त करणारी महापालिकेची यंत्रणा सध्या सक्रिय नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. जागोजागी साचलेले पाणी, त्यातून होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीतून डेंगीचा संभाव्य धोका वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

शहरात पडत असलेल्या पावसाने जागोजागी पाणथळ निर्माण होत आहेत. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्येही अडगळीच्या जागी पडलेल्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे दिसते. तसेच बाटल्या, टायर अशा वस्तूंमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये डेंगीचा आजार पसरविणाऱ्या एडिस इजिप्ती डासांची पैदास होत आहे. याबाबत पालिकेने कोणतीही ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. 

पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उघड्यावर अडगळीचे सामान ठेवले आहे. त्यात पावसाचे पाणी साचले आहे. तसेच, मोकळ्या मैदानात टाकलेल्या कचऱ्यामध्ये फुटलेल्या काचेच्या बाटल्या व त्यांच्या झाकणांमध्येही पावसाचे पाणी साचल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे. नदीपात्र रस्त्यावर दशक्रिया विधीच्या जवळील समाधिस्थळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यातही डासांची पैदास झाल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. 

कीटकजन्य आजारांचे वाढते प्रमाण
शहरात डेंगी, चिकुनगुनिया या कीटकजन्य आजारांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये डेंगीच्या तापाने शहर फणफणण्याचा धोका आहे. याकडे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक चिकुनगुनियाचे रुग्ण पुण्यात आढळले होते, तर डेंगीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती. यंदा पुणेकरांचा हा संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने ठोस काम केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

डास नियंत्रण आघाडीवर शांतता
घरातील सर्वेक्षण, घरभेटी, डासांच्या पैदासाची ठिकाणे शोधण्यावर भर दिल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. प्रत्यक्षात मात्र डास नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. कीटक नियंत्रण औषध फवारणी, पाणथळ नष्ट करणे अशा प्रकारची कामे शहरात होताना दिसत नाहीत, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. 

महापालिकेने काय केले?
महापालिकेने कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपातील डासांची पैदास होणाऱ्या आठ हजार ९०० जागा शोधल्या आहेत. त्या जागांवर डास निर्मूलन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बहुतांश जागा खासगी मालकीच्या आहेत. अशा सुमारे २५० जागामालकांना नोटिसा बजावल्या आहेत. 

डास नियंत्रणासाठी औषधांची खरेदी पूर्ण झाली आहे. तसेच त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळही उपलब्ध करण्यात आले आहे.
- डॉ. वैशाली जाधव, उपआरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

Web Title: pune news dengue danger increase