डेंगीच्या तापाने पुणेकर फणफणले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे - डेंगीच्या तापाने पुणेकर आजारी पडले आहेत. बारा दिवसांमध्ये शहरात डेंगीचे 224 रुग्ण आढळल्याची माहिती पुढे आली आहे. येरवडा, कळस आणि धानोरी या भागात डेंगीचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे - डेंगीच्या तापाने पुणेकर आजारी पडले आहेत. बारा दिवसांमध्ये शहरात डेंगीचे 224 रुग्ण आढळल्याची माहिती पुढे आली आहे. येरवडा, कळस आणि धानोरी या भागात डेंगीचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

शहरातील डेंगीचा ताप वेगाने वाढत आहे. एकेका दिवसामध्ये 24 ते 30 डेंगीचे रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत डेंगीचे निश्‍चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या 795 झाली आहे. डेंगी झाल्याचे स्पष्ट लक्षणे दिसत असलेल्या संशयित रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेली आहे. त्यापैकी 767 डेंगीचे रुग्ण हे चार महिन्यांमधील असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

का वाढतोय डेंगी? 
शहरात गेल्या महिन्यात पडलेल्या दमदार पावसाचे पाणी सोसायट्यांच्या परिसरात, मोकळ्या मैदानात पडलेल्या नारळ करवंट्यांमध्ये साचले. त्या स्वच्छ पाण्यात डेंगीच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होत आहे. हे डास चावल्याने रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सर्व भागात डेंगीचा हा ताप वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविले आहे. 

सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्यांतून साचलेल्या पाण्यात डेंगीच्या आळ्या सापडल्या आहेत. रुग्णालये, सरकारी कार्यालय अशा ठिकाणी डेंगीचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजाविण्यात येत आहेत. शहरात आतापर्यंत साडेचार हजार नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

क्षेत्रीय कार्यालय ................ डेंगीच्या रुग्णांची संख्या 
नगर रस्ता, वडगाव शेरी ....... 81 
येरवडा, कळस, धानोरी ........ 167 
ढोले पाटील ..................... 80 
औंध, बाणेर .................... 17 
घोले रस्ता, शिवाजीनगर ........ 43 
कोथरूड .......................... 13 
धनकवडी, सहकारनगर .......... 29 
टिळक रस्ता, सिंहगड रस्ता ..... 8 
वारजे, कर्वेनगर .................... 10 
हडपसर, मुंडवा .................... 47 
वानवडी, रामटेकडी .............. 23 
कोंढवा, येवलेवाडी ............... 27 
कसबा, विश्रामबागवाडा ......... 110 
भवानी पेठ .................... 107 
बिबवेवाडी .................... 33 

महिना ............. रुग्णसंख्या 
जानेवारी .......... 8 
फेब्रुवारी ......... 2 
मार्च ............. 4 
एप्रिल ............ 5 
मे ................. 3 
जून ............... 6 
जुलै .............. 58 
ऑगस्ट .......... 234 
सप्टेंबर ..... 251 
12 ऑक्‍टोबरपर्यंत ..... 224 

(स्रोत ः आरोग्य विभाग, पुणे महापालिका) 

Web Title: pune news dengue fever