डेंगीच्या वाढीला असहकार कारणीभूत

डेंगीच्या वाढीला असहकार कारणीभूत

पुणे - खासगी डॉक्‍टर आणि प्रयोगशाळा यांचा असहकार हाच डेंगी नियंत्रणातील मोठा अडथळा असल्याचे ‘निदान’ महापालिकेने केले आहे. डेंगी झालेल्या प्रत्येक रुग्णाची माहिती महापालिकेला कळविणे बंधनकारक असतानाही खासगी डॉक्‍टर याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे डेंगी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यास मर्यादा पडत असल्याची चर्चा आता महापालिकेत सुरू झाली आहे. 

शहरात गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डासांपासून संसर्ग होणाऱ्या या रोगांमुळे पुणेकर तापाने फणफणले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत एक हजार चारशे रुग्णांना डेंगी झाला आहे; पण महापालिका मात्र डेंगीच्या या वाढत्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी झाल्याचे दिसत आहे. याबाबत आता महापालिकेने खासगी डॉक्‍टर आणि प्रयोगशाळांना जबाबदार ठरविण्याचे धोरण अवलंबिले आहे. 

डेंगीच्या प्रत्येक रुग्णाची नोंद महापालिकेकडे करणे आवश्‍यक आहे, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे डेंगीचे निदान होतच त्या रुग्णाची माहिती महापालिकेला कळविली पाहिजे. त्यातून संबंधित भागातील डासोत्पत्तीची ठिकाणे तातडीने नष्ट करता येतील; पण डॉक्‍टर आणि प्रयोगशाळा रुग्णाची माहिती महापालिकेला कळवत नाहीत. त्याचा परिणाम शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे, अशी चर्चा आता महापालिकेत सुरू आहे. डेंगी झाल्याचे निदान प्रयोगशाळा डॉक्‍टरांना सांगतात, संबंधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनाही सांगतात; पण महापालिकेला मात्र सांगत नाहीत, याकडे आता आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे, अशीही माहिती पुढे आली आहे. 

महापालिकेला डेंगीच्या रुग्णांची माहिती कळविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यावर कारवाई करणे आवश्‍यक आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाला पत्र पाठविल्याची माहिती मिळाली. डेंगी हा आजार अधिसूचित (नोटिफायबल) आहे. त्यामुळे कीटकजन्य आजारांची माहिती कळविण्यात कसूर करणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध ‘नोटिफायबल डिसीज ॲक्‍ट’अंतर्गत कोणती कारवाई करता येऊ शकेल, याचे मार्गदर्शनही या पत्रातून मागविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com