खासगी रुग्णालयांत डेंगीचे डास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

डासांची पैदास झालेल्या रुग्णालयांना नोटीस दिली आहे. तेथील डासांच्या अळ्या नष्ट केल्या आहेत. रुग्णालयांमध्ये परत डास आढळल्यास कारवाई होईल. 
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

पुणे - शहरातील रुग्णालयांत जाताना तुम्ही नक्की काळजी घ्या... तिथेही डेंगीचा डास तुम्हाला डंख मारू शकतो... कारण महापालिकेतर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत २३ खासगी रुग्णालयांमध्ये डेंगीच्या डासांची उत्पत्ती झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

शहरातील सोसायट्यांपाठोपाठ आता रुग्णालयेदेखील डेंगीच्या संसर्गापासून सुरक्षित राहिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिकेतील आरोग्य खात्याच्या कीटक विभागातर्फे सोसायट्यांच्या पाठोपाठ खासगी रुग्णालयांमधून कीटक सर्वेक्षण होत आहे. आतापर्यंतच्या सर्वेक्षणात २३ रुग्णालयांमध्ये डेंगीचे डास आढळले आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहायक आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले. 

दहा दिवसांत विषाणू तयार
आजारी माणसाच्या रक्तातील डेंगीच्या विषाणूचा एडिस इजिप्ती जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संसर्ग होतो. एडिस इजिप्ती हा लहान, काळा डास आहे. त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्याचा आकार पाच मिलिमीटर असतो. डास चावल्यानंतर शरीरात विषाणू तयार करायला आठ ते दहा दिवस लागतात. त्यानंतर तो रोगाचा प्रसार करतो. 

कोणते डास आढळले?
एडिस एजिप्ती हे डेंगीचा प्रसार करणारे आणि क्‍सुलेक्‍स हे जापनीज मेंदूज्वर व हत्तीरोगाचा संसर्ग करणारे डास या रुग्णालयांमधील सर्वेक्षणात आढळले आहेत. यात या दोन्ही प्रकारचे मिळून १६ नर तर २४ मादी डास आढळले आहेत. 

डासांच्या अळीचे सर्वेक्षण
डासनियंत्रणामध्ये प्रौढ डासांपेक्षा त्यांची अंडी आणि अळ्या नष्ट करणे महत्त्वाचे असते. अंडी आणि अळ्यांची संख्या जेवढी जास्त तेवढा डासांचा उद्रेक होण्याचा धोका वाढतो. सर्वेक्षण केलेल्या २३ रुग्णालयांमध्ये डासांची १६५ अंडी आणि अळ्या आढळल्या.

या रुग्णालयात डास
सातारा रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालय, कश्‍यप हॉस्पिटल, धनकवडी येथील सुयोग हॉस्पिटल, आनंद हॉस्पिटल, कसबा पेठेतील सूर्या हॉस्पिटल, मनोहर जोशी रुग्णालय, दीनदयाळ हॉस्पिटल, डॉ. तोडकर हॉस्पिटल, सिंहगड रस्त्यावरील पाटील हॉस्पिटल, प्रचिती हॉस्पिटल, पर्वती येथील सहारा रुग्णालय, गुरुकृपा प्रसूतिगृह, विश्रांतवाडी येथील विनोद मेमोरिअल हॉस्पिटल, केदारनाथ हॉस्पिटल, औंधमधील मेडीपॉइंट रुग्णालय, एम्स रुग्णालय, कोथरूडमधील शाश्‍वत आणि वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालय.

कुठे आढळले डास?
शहरातील २३ पैकी ९ रुग्णालयांच्या गच्चीवर डास आढळले आहेत. गच्चीवर साचलेल्या पावसाच्या पाण्यात डासांची पैदास झाली. पाण्याच्या टाकीजवळ आणि भंगार साहित्याजवळ प्रत्येकी तीन रुग्णालयांमध्ये डास सापडले. रुग्णालयांमधील बॅरल आणि प्लॅस्टिकच्या डब्यातही डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. प्लॅस्टिकचा कागद, चेंबर, नाली, बकेट येथेही डास असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

काय धोका आहे?
शहरात सध्या स्वाइन फ्ल्यू, डेंगी यांच्यासह विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांची गर्दी वाढली आहे. अशा ठिकाणी डेंगीच्या डासांची पैदास वाढणे हे सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. ज्या ठिकाणी रुग्णांवर उपचार होतो, त्या परिसरात डासांची उत्पत्ती होत असल्याचे यातून स्पष्ट होते.

Web Title: pune news dengue mosquito in private hospital