विकास अाराखडा एका वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

सर्व महसूल अभिलेख ‘डिजिटल’ स्वरूपात तयार केले आहेत. हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन विकास आराखड्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एका वर्षाच्या आत प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे,
-किरण गित्ते, महानगर आयुक्त

पुणे - पुणे प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा (डीपी) तयार करण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली असून, प्रस्तावित विकास आराखड्याचा ‘इरादा’ सोमवारी (ता. १९) पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केला. एका वर्षात ‘डीपी’ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ‘पीएमआरडीए’ने या वेळी स्पष्ट केले.

राज्य सरकारकडून मंगळवारी (ता. २०) ‘राजपत्र’ प्रसिद्ध होणार असून पुढील ६० दिवसांच्या आत नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहनही केले.

गतवर्षी डिसेंबर महिन्यात ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झालेल्या ‘पीएमआरडीए’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ‘अर्थसंकल्प आणि विकास आराखडा’ तयार करण्यासाठी अंतिम मान्यता दिली होती.

महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले, ‘‘पीएमआरडीएचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा प्राधिकरण कार्यालयात कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत नागरिकांना निरीक्षणासाठी ठेवण्यात आला आहे. ‘सद्यःस्थितीतील जमिनीचा वापर’ (एक्‍सिस्टिंग लॅंड यूज- ईएलयू) याबाबतचा नकाशा तयार करण्याची प्राथमिक तयारी केली असून येत्या ३१ जुलैपर्यंत हे काम पूर्ण होईल. हवाई छायाचित्रण करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून १० सें.मी.पर्यंतची स्पष्टता आणि अचूकता असलेला नकाशा तयार आहे.’’

Web Title: pune news Development Plan