पन्नाशी ओलांडलेल्या पाचपैकी एकाला मधुमेह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पुणे - पन्नाशीच्या पुढील पाच व्यक्तींपैकी एका व्यक्तीला मधुमेह होत असल्याचे "एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल'ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हॉस्पिटलकडून मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्यातून निर्माण होणारे अंधत्वाचे प्रमाण याविषयी सर्वेक्षण करण्यात आले.

पुणे - पन्नाशीच्या पुढील पाच व्यक्तींपैकी एका व्यक्तीला मधुमेह होत असल्याचे "एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल'ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हॉस्पिटलकडून मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्यातून निर्माण होणारे अंधत्वाचे प्रमाण याविषयी सर्वेक्षण करण्यात आले.

सुमारे 3 हजार 600 व्यक्तींची मधुमेह आणि नेत्र तपासणी करण्यात आली. त्यात पन्नाशीनंतरच्या व्यक्तींमध्ये मधुमेह वाढल्याचे दिसून आले. सर्वेक्षणात केलेल्या तपासणीत सुमारे 22 टक्‍क्‍यांहून अधिक व्यक्तींना मधुमेह होता आणि त्यातील जवळपास 13 टक्के जणांना डायबेटिक रेटिनोपॅथी (डोळ्यांच्या अंतरपटलावर होणारा परिणाम) आढळून आला, अशी माहिती हॉस्टिपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कापसे आणि डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

हॉस्पिटलकडून "रॅपिड असेसमेंट ऑफ ऍव्हॉइडेबल ब्लाइंडनेस ऍण्ड डायबेटिक रेटिनोपॅथी' हे सर्वेक्षण मागील वर्षी ऑगस्टमध्ये करण्यात आले. त्याला लंडन स्कूल ऑफ हायजिन ट्रॉपिकल मेडिसीनचे सहकार्य मिळाले. या सर्वेक्षणातील 70 टक्के व्यक्तींनी कधीही डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी डोळ्यांची तपासणी केली नसल्याचे आढळून आले.

डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. त्याचे वेळीच निदान झाले तर त्यावर उपचार होऊ शकतात आणि अंधत्व टाळता येऊ शकते. मधुमेही व्यक्तींना दृष्टी गमावण्याचाही धोका असतो. याच समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे सर्वेक्षण केले. मात्र, त्यात मधुमेही व्यक्तींचे प्रमाण वाढत असल्याचे निर्दशनास आले. या सर्वेक्षणाचा अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्यात येणार आहे. याविषयी शनिवारी (ता. 20) एक बैठक होणार आहे. लंडन स्कूल ऑफ हायजिन ट्रॉपिकल मेडिसीनच्या डॉ. सारा आणि आयला उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, 'पन्नाशीनंतर मधुमेहाचे प्रमाण किती लोकांमध्ये आहे, त्यातून निर्माण होणारे अंधत्व आणि मधुमेहाचा शरीरावर झालेला परिणाम आदी बाबी तपासण्यात आल्या. त्यात 22 टक्के व्यक्तींना मधुमेह असल्याचे निर्दशनास आले, तर काही व्यक्तींमध्ये मधुमेहामुळे अंधत्व येण्याची शक्‍यता असल्याचे दिसले.''

कापसे म्हणाले, 'सर्वेक्षणातील निष्कर्ष शहरांमध्ये मोतीबिंदूच्या तसेच डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सेवा सुधारण्यासाठी आणि त्यासाठी नियोजन करण्यासाठी वापरले जाणार आहे. मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता हे सर्वेक्षण खूपच महत्त्वपूर्ण असून, मधुमेहामुळे अंधत्व येण्याची शक्‍यताही वाढली आहे, त्यामुळे वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.''

Web Title: pune news diabetes after 50 year age