‘डिजिटल गोल्ड’ला झळाळी!

सलील उरुणकर
शनिवार, 24 मार्च 2018

पुणे - दर महिन्याला मला मिळणाऱ्या पैशातून मी गेले काही दिवस सोनं खरेदी करत होते... अगदी शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत मला जमेल तसं मी सोनं खरेदी केल्यानंतर आज माझ्याकडे काही ग्राम सोनं जमलं आहे... माझ्या मुलीच्या लग्नासाठी त्याचा उपयोग करण्याचं माझं स्वप्न आहे... ऑफिसमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या शालन नगरकर यांनी बोलून दाखविलेली ही वाक्‍ये कोणाच्याही काळजाला भिडतील अशीच आहेत.

पुणे - दर महिन्याला मला मिळणाऱ्या पैशातून मी गेले काही दिवस सोनं खरेदी करत होते... अगदी शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत मला जमेल तसं मी सोनं खरेदी केल्यानंतर आज माझ्याकडे काही ग्राम सोनं जमलं आहे... माझ्या मुलीच्या लग्नासाठी त्याचा उपयोग करण्याचं माझं स्वप्न आहे... ऑफिसमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या शालन नगरकर यांनी बोलून दाखविलेली ही वाक्‍ये कोणाच्याही काळजाला भिडतील अशीच आहेत.

आपल्या मुला-मुलींच्या लग्नात सोन्याचे दागिने करावे, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. पण त्या वेळी नेमके सोन्याचे भाव वाढलेले असतात आणि त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होते. आता यावर एक पर्याय उपलब्ध झाला आहे; तो म्हणजे ‘डिजिटल गोल्ड’चा. 

‘डिजिटल गोल्ड’ म्हणजे काय? 
कमोडिटी मार्केटमध्ये सर्वाधिक चढ-उतार चांदीच्या दरात होते, तर सोने हे शांतपणे वाढत जात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे ‘गोल्ड हेजिंग’ करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. ‘गोल्ड हेजिंग’मध्ये सोने खरेदी करताना ‘एमसीएक्‍स’ एक्‍स्चेंजला फक्त चार टक्के रक्कम भरावी लागते.

काही कंपन्या ग्राहकांकडून पंधरा टक्के ‘बुकिंग’ची रक्कम घेतात, तर उर्वरित ८५ टक्के रक्कम ही एक, दोन किंवा तीन वर्षांच्या बिनव्याजी हप्त्यावर भरण्याची मुभा दिली जाते. त्याचा परिणाम असा होतो, की ‘बुकिंग’ केल्याच्या क्षणानंतर प्रत्यक्षात सोने घेण्यापूर्वीच दर वाढले, तर त्याचा थेट लाभ ग्राहकांना मिळण्यास सुरवात होते. तर दुसरीकडे कंपनीला ‘एमसीएक्‍स’ची चार टक्के रक्कम सोडून उर्वरित रक्कम वापरायला मिळते. ही रक्कम त्यानंतर ‘लिक्विड फंड’मध्ये गुंतविली जाते आणि त्याचा परतावा हा कंपनीचा फायदा ठरतो. 

गोल्ड डिपॉझिट 
अनेकांकडे सध्या घरात सोने पडून असते. त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. तसेच ते सुरक्षित ठेवण्याचाही प्रश्‍न असतोच. त्यामुळे हे सोने पुन्हा बाजारात आणण्यासाठी सरकारकडून ‘गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम’ राबविण्यात येत आहे. या योजनेच्या धर्तीवरच ‘गोल्ड डिपॉझिट’ची योजनाही अनेक सराफांकडे उपलब्ध आहे. सराफाकडे सोने जमा केल्यानंतर तेवढी रक्कम बॅंक खात्यामध्ये जमा केली जाते. जमा केलेल्या सोन्याच्या बदल्यात राष्ट्रीयीकृत बॅंकेची ‘गॅरंटी’सुद्धा काही व्यावसायिक देतात. 

ऑनलाइन सोने खरेदी करण्यासाठीची मानसिकता अजून ग्राहकांमध्ये तयार झालेली दिसत नाही. प्रस्थापित सराफांच्याच संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲप्समार्फत ऑनलाइन खरेदीला ग्राहक पसंती देतात. मात्र अद्यापही दागिन्यांची निवड ही प्रत्यक्षात दुकानात येऊनच करण्याकडे ग्राहकांचा, विशेषतः महिलांचा कल आहे.
- फत्तेचंद रांका, संचालक, रांका ज्वेलर्स

ऑनलाइन पेमेंट करून सोने खरेदीची सुविधा उपलब्ध झाली आहे. अगदी पन्नास रुपयांपासून कोणतीही व्यक्ती सोने विकत घेऊ शकते. टप्प्याटप्प्यामध्ये भरलेल्या रकमेच्या एकूण मूल्याएवढे सोने कोणत्याही क्षणी प्रत्यक्षात सराफाकडे जाऊन विकत घेता येते.
- महेंद्र लुनिया, संचालक, विघ्नहर्ता गोल्ड 

Web Title: pune news digital gold