अहंकार, कुटुंबीयांच्या हस्तक्षेपामुळे वाढले घटस्फोट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

जीवनशैलीत झालेला बदल, इगो प्रॉब्लेम, कुटुंबातील सदस्यांचा नको तेवढा हस्तक्षेप अशा विविध कारणांमुळे अलीकडच्या काळात घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे; परंतु त्यांच्या नावाखाली ‘टिकवा नाही तर मिटवा’ अशी संस्कृती वाढीस लागली आहे. दोघेही उच्चशिक्षित आणि कमावणारे असल्यावर एकमेकांचे ऐकण्याची मनःस्थिती नसते. त्यातून हे प्रकार वाढीस लागतात.
- स्मिता जोशी, विवाह समुपदेशक

पुणे - मंगळसूत्र, टिकली, बांगड्या घालणे प्रीतीला (नाव बदलले आहे) आवडत नाही, तर तिने ते वापरावे असा संदीपचा (नाव बदलले आहे) आग्रह. त्यातून वाद विकोपाला गेला.... तर माझी मुलगी घाणेरडी (धुणी-भांडी) कामे करणार नाही. तुमच्या घरात वॉशिंग मशिन नाही, तिला कामाची सवय नाही, त्यामुळे ते तुम्ही तातडीने आणा, सासूबाईने जावयाच्या मागे लावलेला तगादा... तुमच्या मुलीला काहीच येत नाही, आम्ही सांगेल तशी ती वागत नाही ... अशी सासूबाईंची सुनेमागे असलेली भूणभूण...

कुटुंबातील सदस्यांचा वाढता हस्तक्षेप, इगो प्रॉब्लेम, जगण्याचे स्वातंत्र्य या व अशा कारणांमुळे नवदाम्पत्यामधील घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. गेल्या तीन वर्षांत कौटुंबिक न्यायालयाकडे दाखल झालेल्या अर्जांच्या आकडेवारीवरून हे समोर आले आहे. सुमारे बारा हजार २७२ अधिक अर्ज या न्यायालयाकडे दाखल झाले आहेत. यापूर्वीहीदेखील घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल व्हायचे. माहेरवरून पैसे आणावेत, मूल होत नाही म्हणून अथवा चारित्र्यावरून अशी त्या मागची कारणे असत. मात्र, काळ बदलला आणि घटस्फोट घेण्यामागची कारणेही बदलली असल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे वाद झाले तरी, प्रकरण घटस्फोटापर्यंत जात नव्हते. मात्र, कुटुंब छोटे झाले. त्यामुळे मुलाच्या अथवा मुलीच्या संसारात कुटुंबातील सदस्यांचा हस्तक्षेप वाढू लागला आहे. त्यात दोघेही कमविणारे असतील, दोघांच्या स्वतंत्र विचारसरणीतून निर्माण होणारा इगो हीदेखील घटस्फोटामागची कारणे ठरू पाहत आहेत. त्यातून ‘टिकवा अथवा मिटवा’ ही नवी संस्कृती वाढीस लागली आहे. किरकोळ कारणावरूनदेखील प्रकरणे घटस्फोटापर्यंत जाऊ लागली आहेत. 

पूर्वी घटस्फोटाच्या प्रकरणात पोटगी, मुलांचा ताबा अशा कारणांवरून विलंब होत असे. तसेच एकतर्फी दावे दाखल होण्याचे प्रमाण जास्त होते. आता मात्र परस्परांच्या सामंजस्यातून घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अर्ज दाखल करताना त्यामध्ये स्पष्टपणे तसे कारण नमूददेखील केलेले असते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये लगेच न्यायालयाकडून निकाल दिला जातो.

Web Title: pune news divorse family