सांगा आम्ही दिवाळी कशी करायची? 

राजेंद्रकृष्ण कापसे 
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

महसूल मंत्री सकारात्मक निर्णय घेतील 
नागरिक 30-35 वर्षांपासून येथे राहत असतील. त्यांची घरे आम्ही पाडू देणार नाही. घर वाचविण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील मी भेटलो आहे. येथील रस्त्याच्या भूमिपूजनासाठी पाटील येणार आहेत. त्या वेळी त्यांच्याकडून या नागरिकांची घरे वाचविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले.

खडकवासला : "सरकारने आम्हाला घर पाडण्याच्या नोटिसा दिल्या, मग सांगा आम्ही दिवाळी कशी करायची.'' अशी चिंता कमल शेखर जाधव यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या पतीचे निधन झाले असून, त्यांना तीन मुली आहेत व त्या बांधकामावर वाळू उचलण्याचे काम करतात. त्यांच्यासह 675 जण कोंढवे-धावडे येथील सरकारी जागेत 30-35 वर्षांपासून राहत आहेत. त्यांना नोटिसा दिल्या आहेत. 

हवेली तहसीलदारांनी महसूल व वने विभागाच्या जागेवर अतिक्रमण, सर्वोच्च न्यायालयातील काही दाखल याचिकांचा संदर्भ देऊन या नोटिसा पाठविल्या आहेत. कोंढवे-धावडे येथील ग्रामपंचायत मागे असलेल्या परिसरात लमाण वस्ती, भैरवनाथनगर आहे. तेथील 675 जणांना महसूल विभागाने नोटिसा पाठविल्या आहेत. नोटिसा सप्टेंबर महिन्यातील असल्या, तरी त्यातील 300 जणांना त्या आता दिल्या आहेत. 

नोटिसा देण्याचे काम सध्या थांबले असले, तरी घरे कधी पडतील, याची भीती येथील नागरिकांना आहे. दरम्यान, कमल जाधव यांच्याप्रमाणे मजुरी काम करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून मुलांना शिक्षण देणाऱ्या कविता पवार, कमल राठोड, सांगुना कांबळे, कविता राठोड, पारूबाई राठोड आदी महिलांनाही त्यांचे घर पाडण्याची भीती आहे. 

आमदार भीमराव तापकीर यांनी माजी सरपंच उमेश सरपाटील, सुभाष नाणेकर, संतोष राठोड, अभिजित धावडे, माणिक मोकाशी आदींसह महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची भेट घेतली. उमेश सरपाटील संतोष राठोड, सुभाष नाणेकर,अभिजित धावडे, माणिक मोकाशी, त्रिंबक मोकाशी, मिना राजपूत, सचिन कांबळे, प्रकाश साळवे, सुनित लिंबोरे, बापु सरपाटील, आयुब शेख, विलास ढम, उमेश कोकरे उपस्थित होते. या जागेवर 1980च्या अगोदरपासून नागरिक राहत आहेत. जिल्ह्यात फक्त कोंढवे-धावडे गावातील 675 नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत. महसूल विभागाला कोण नोटिसा काढण्यास कोण भाग पाडत आहे. ही जागा कोणताही प्रकल्प, उपक्रम किंवा रस्त्यासाठी लागणार नाही. राठोड नावाच्या लोकप्रतिनिधी मार्फत सरकारी अधिकाऱ्यांना नोटिसा अदा करण्याच्या सूचना केल्या जात असल्याचे या शिष्टमंडळाने या वेळी संजय राठोड यांना सांगितले. याबाबत संजय राठोड यांनी हवेली तहसीलदारांशी संपर्क साधून रहिवाशांना नोटिसा देणे तातडीने थांबवा व महसूल विभागाच्या नियमानुसार ही घरे नियमित करा, अशी सूचना केली. 

महसूल मंत्री सकारात्मक निर्णय घेतील 
नागरिक 30-35 वर्षांपासून येथे राहत असतील. त्यांची घरे आम्ही पाडू देणार नाही. घर वाचविण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील मी भेटलो आहे. येथील रस्त्याच्या भूमिपूजनासाठी पाटील येणार आहेत. त्या वेळी त्यांच्याकडून या नागरिकांची घरे वाचविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले.

Web Title: Pune news diwali in uttamnagar