डीपी रस्त्यावरील बांधकामांवर दोन दिवसांत कारवाई - आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

पुणे - विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्यावरील म्हात्रे पूल ते राजाराम पुलापर्यंत नदीपात्रातील बांधकामे पाडण्याच्या राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या (एनजीटी) आदेशाची प्रत मिळताच, दोन दिवसांत येथील बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी सांगितले. महापालिका आणि पाटबंधारे खाते एकत्रित कारवाई करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुढील चार दिवसांमध्ये नदीपात्रातील बांधकामे पाडण्याची शक्‍यता आहे.

या रस्त्यावरील म्हात्रे पूल ते राजाराम पुलापर्यंत नदीपात्रात विशेषतः पूररेषेच्या आत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत. मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल आणि व्यावसायिक कारणांसाठी ही बांधकामे करण्यात आली आहेत. येथील बांधकामांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन, रहिवाशांना धोका पोचण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर नदीपात्रातील बांधकामे चार आठवड्यांत पाडून ही जागा मोकळी करण्याचा आदेश "एनजीटी'ने महापालिका प्रशासनाला दिला आहे.

कुणाल कुमार म्हणाले, ""नदीपात्रातील बांधकामे पाडण्याचा आदेश "एनजीटी'ने दिला आहे. मात्र, या आदेशाची प्रत अद्याप प्रशासनाला मिळालेली नाही.

ती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल. त्याआधी महापालिका आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी पाहणी करून त्याचा अहवाल तयार करतील. त्यानंतर कारवाईला सुरवात करण्यात येईल. या संदर्भात, ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत "एनजीटी'कडे याचिका दाखल करण्यात आली होती.

Web Title: pune news dp road construction crime on two days