पूर्ण जिद्द वापराल, तर यशस्वी व्हाल - डॉ. जयंत नारळीकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पुणे - ‘‘मला शाळा- महाविद्यालयातील मुले भेटतात तेव्हा विचारतात, ‘आम्हाला काय उपदेश द्याल?’ अशावेळी माझे एकच सांगणे असते, अर्धवट जिद्द वापरू नका. पूर्ण जिद्द वापराल तर यशस्वी व्हाल. मीसुद्धा पूर्ण जिद्द वापरायचे बंधन स्वतःवर घालून घेतले आहे. तुम्हीही असे एखादे बंधन घालून घ्या, यश मिळवण्यासाठी...’’ अशा शब्दांत मुलांना प्रेरणा देत होते खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर.

दिशा परिवारातर्फे आयोजित सोहळ्यात राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील ४५० विद्यार्थ्यांना थेट दात्यांच्याच हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या वेळी नारळीकर यांनी सहज-सोप्या शब्दांत आणि वैज्ञानिकांच्या कथा सांगत मुलांशी संवाद साधला. ‘वंचित विकास’चे संस्थापक विलास चापेकर, ‘बीव्हीजी’चे संस्थापक हणमंतराव गायकवाड, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते, भाऊसाहेब जाधव, दीपक नागरगोजे, राजाभाऊ चव्हाण, डॉ. मोहन भोई आदी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, ‘‘जगभरात नवनवीन संधी आहेत, त्याचा फायदा घ्या; पण तो मिळवण्यासाठी आधी स्वतःमध्ये आवश्‍यक ते बदल करा.’’

खेचराचा मालक ते शास्त्रज्ञ...
‘‘जवळपास शंभर वर्षांपूर्वी माउंटविल्सन या पाच हजार फूट उंच डोंगरावर वेधशाळा उभारायची होती. डोंगरावर बांधकामाचे आणि दुर्बिणीचे साहित्य कसे न्यायचे, हा मोठा प्रश्न होता. तेवढ्यात खेचराच्या पाठीवर साहित्य वर न्यायचा पर्याय पुढे आला. खेचरं आणली गेली. काही दिवसांत वेधशाळाही उभी राहिली. खेचराच्या मालकाने एकेदिवशी वेधशाळेतील दुर्बिणीतून आकाश पाहिले आणि तो आकाशाच्या प्रेमातच पडला. मग खेचराचा व्यवसाय सोडून तो वेधशाळेत रखवालदार म्हणून नोकरी करू लागला. शास्त्रज्ञांचा अभ्यास कसा असतो, निरीक्षणं कशी असतात... याचा तो अभ्यास करू लागला. विज्ञानाची पुस्तके वाचू लागला. त्याची जिद्द, मेहनत पाहून त्याला बढती मिळत गेली. पुढे तो मोठा शास्त्रज्ञ झाला. वेधशाळेचा प्रमुख बनला. हमसन त्याचे नाव...’’ अशी कथा नारळीकर यांनी मुलांना सांगितली.

तुम्ही कोठे राहता, गरीब आहात की श्रीमंत, तुम्ही किती कष्ट केलेत यापेक्षा मनात जिद्द किती आहे, हे फार महत्त्वाचे आहे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए 

Web Title: pune news dr. jayant narlikar talking