चारित्र्यासह विश्‍वासही टिकवा - सरसंघचालक डॉ. भागवत

चारित्र्यासह विश्‍वासही टिकवा - सरसंघचालक डॉ. भागवत

पुणे - राज्यातील मंत्री एकापाठोपाठ एक वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘चारित्र्य जपा. लोकांनी तुमच्यावर विश्‍वास टाकला आहे, तो सार्थ करण्याचा प्रयत्न करा,’ अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी राज्यकर्त्यांना कानपिचक्‍या दिल्या. ‘कार्यकर्ते खूप आहेत; परंतु चारित्र्यवान कार्यकर्त्यांना एकत्रित करा, त्यांना संधी द्या,’ अशी सूचनाही त्यांनी केल्याची माहिती व्यवस्थेतील सूत्रांनी दिली.

राज्यातील भाजपच्या सत्तेला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. गेल्या तीन वर्षांत पक्षाचे मंत्रिमंडळातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुभाष देशमुख, राजकुमार बडोले, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांच्यासह अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवरही झाला. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांताची एकदिवसीय आढावा बैठक रविवारी पुण्यात कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर येथे झाली. बैठकीला संघ परिवाराशी संबंधित विविध संघटनांचे प्रमुख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. त्या बैठकीत डॉ. भागवत यांनी या कानपिचक्‍या दिल्या. मंत्र्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून संघामध्येही नाराजी असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

सकाळी नऊ वाजता या बैठकीला सुरवात झाली. बैठकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. नेहमीच्या संघ कार्यकर्त्यांऐवजी नव्या कार्यकर्त्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली होती. निमंत्रितांशिवाय या बैठकीला कोणालाही आता सोडण्यात येत नव्हते. एवढेच नव्हे, तर मंत्र्यांचे पीए यांनादेखील या बैठकीत प्रवेश देण्यात आला नाही. बैठकीला उपस्थित असलेल्यांचा मोबाईलदेखील काढून घेण्यात आला होता.

बैठकीच्या सुरवातील संघ परिसराशी संबंधित विविध संघटनांकडून आढावा सादर करण्यास सांगण्यात आले. तो घेतल्यानंतर त्यांच्याकडून भविष्यातील योजना आणि काय अपेक्षा आहेत, यांची सर्व माहिती घेण्यात आली. पंधरा मिनिटे सोडली तर संपूर्ण वेळ डॉ. भागवत या बैठकीला उपस्थित राहून माहिती घेत होते. बैठकीचा समारोप डॉ. भागवत यांच्या भाषणाने झाला. ते म्हणाले, ‘‘सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग कसा वाढले, सामाजिक समरसता कशी वाढले, या दृष्टीने प्रयत्न करा. सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने सर्वांचे पाऊल एकाच दिशेने कसे पडले, यासाठी प्रयत्न करा. चारित्र्यवान कार्यकर्त्यांना गतिशील करा.’’

फडणवीस आणि शिवाजीराव कदम भेट
बैठकीच्या ठिकाणी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. त्यांच्या सोबत पंकजा मुंडेदेखील होत्या; मात्र बैठकीला जाण्याआधी मुख्यमंत्र्यांची गाडी बालशिक्षण मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या भारती अभिमत विद्यापीठाचे उपकुलपती शिवाजीराव कदम यांच्या घराकडे वळाली. त्याच ठिकाणी संघाचे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर हेदेखील राहतात. पहिल्यांदा मुख्यमंत्री त्यांच्या घरी गेले, असा समज कार्यकर्त्यांचा झाला; मात्र कर्जतकर हे बैठकीला उपस्थित होते. चौकशी केल्यानंतर मुख्यमंत्री हे कदम यांच्या निवासस्थानी गेल्याचे समजले. सुमारे पाऊणतास मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी होते. या बैठकीत काय चर्चा झाली, याबाबतची उत्सुकता बैठकीच्या ठिकाणी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com