चित्रांतून ‘नदी वाचवा’चा संदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पुणे - नदीत रासायनिक द्रव्ये मिसळल्यामुळे जलचरांवर आलेले संकट अन्‌ नदीची कचराकुंडी करणारे नागरिक... अशा वस्तुस्थितीचे भान करून देणारी चित्रे तरुणाई नदीपात्रालगतच्या भिंतीवर रंगवत होती. येणारे-जाणारे त्या चित्रांकडे पाहत होते अन्‌ त्यांच्या मनी चित्रांच्या लयबद्ध सौंदर्याबरोबरच समाजभानही ठसले जात होते.

वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरच्या विद्यार्थ्यांनी डेक्कन नदीपात्रातील भिंत रंगवून ‘नदी वाचवा’चा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अवघ्या तीन दिवसांत नदीपात्रातील भिंत रंगविण्याचे काम तरुणाईने पूर्ण केले. येता-जाताना बिनधास्तपणे नदीत कचरा फेकणारे नागरिक पाहायला मिळतील आणि रासायनिक द्रव्यांमुळे नदी प्रदूषणही वाढल्याचे दिसून येईल. याविषयी नागरिकांमध्ये जागृती करावी, हा विचार करून तरुणांनी ही मोहीम हाती घेतली. २५ ते ३० जणांच्या ग्रुपने भिंत रंगविण्याचे काम हाती घेतले होते. नदीपात्र स्वच्छ ठेवा, नदीतील जलचर प्राण्यांच्या सुरक्षिततेचा विचार करा आणि रासायनिक द्रव्ये नदीत सोडू नका, असा संदेश या चित्रांमधून देण्याचा प्रयत्न केला आहे. मंदार खेळे, सचेत शेट्टी, हसन फकरी, शंतनू गायकवाड, लोकेश कदम आणि रुचाराणी कुवर-पाटील यांची ही संकल्पना आहे. भिंत रंगविण्यासाठी लागणारे रंग काही संस्थांनी दिले आहेत.

या मोहिमेबद्दल श्रेय महाशब्दे म्हणाला, ‘‘नदीत कचरा फेकणारे नागरिक नेहमीच निदर्शनास यायचे. त्यांना हे करण्यापासून थांबवावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी नदीपात्रातील ४५ मीटरच्या भिंतीवर चित्रे काढली. त्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली. त्यानंतर इन्स्टाग्राम आणि फेसबुकद्वारे प्रचार केला. त्यामुळे या मोहिमेला सर्वसामान्यांनीही हातभार लावला.’’

Web Title: pune news drawing river saving message