बारावीत उत्तीर्ण; प्रथम वर्षाला प्रवेश नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे - बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होऊनही प्रवेश प्रक्रिया संपल्याचे कारण देत महाविद्यालये प्रथम वर्षासाठी प्रवेश नाकारत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

पुणे - बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होऊनही प्रवेश प्रक्रिया संपल्याचे कारण देत महाविद्यालये प्रथम वर्षासाठी प्रवेश नाकारत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून बारावीची फेरपरीक्षा घेतली. मात्र या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश मिळण्यात अडचणी येत असल्याने वर्ष वाया जाण्याची चिंता विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या ऋषी परदेशी, सत्यम पांडे, राज घाटे, पुरुषोत्तम चव्हाण यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना निवेदन दिले. याबाबत शैक्षणिक प्रवेश विभागाचे कुलसचिव उत्तम चव्हाण म्हणाले, ‘पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पात्रता निश्‍चित करण्याचे काम ३१ ऑक्‍टोबरपर्यंत होते. तोपर्यंत महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात. रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकतो. मात्र, विद्यार्थ्यांना विशिष्ट महाविद्यालयांत प्रवेश हवा असतो. तेथे रिक्त जागा नसल्यास प्रवेश मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठाने या वर्षी महाविद्यालयांना २० टक्के जागा वाढवून दिल्या आहेत.’’ एका विद्यार्थ्याला बारावीत ४२ टक्‍के गुण मिळाले होते. मात्र प्रवेश मिळविण्यासाठी किमान ४५ टक्के गुण हवेत, असे सांगून वडगावशेरीतील एका महाविद्यालयाने त्याला वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेश नाकारला. ही बाब उत्तम चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली असता विद्यापीठाचा असा कोणताही नियम नसल्याचे त्यांनी सांगितले.

संकेतस्थळावर द्या रिक्‍त जागांची माहिती
प्रथम वर्षाचे प्रवेश हे महाविद्यालय स्तरावर होत आहेत, मात्र ते समजण्याची कोणतीही केंद्रीय व्यवस्था विद्यापीठाकडे नाही. त्यामुळे सर्व महाविद्यालयांतील रिक्त जागांचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

Web Title: pune news education college