यंदा सहावीपासून विज्ञान व इंग्रजीची चाचणी

संतोष आटोळे
बुधवार, 26 जुलै 2017

इयत्ता नववीची नैदानिक चाचणीही यंदा पहिल्यांदाच घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी, तृतीय भाषा इंग्रजी, गणित व विज्ञान या चार विषयांची ही चाचणी असणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत पास करण्याचे धोरण अद्यापही सुरु असल्याचे नववीमधील या विद्यार्थ्यांचे चाचणीचे निकाल फार महत्त्वाचे असणार आहेत. 

शिर्सुफळ : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या परिषद) विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्वाकांक्षासमोर ठेवत राबवित असलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यात घेण्यात येणाऱ्या नैदानिक चाचण्यांऐवजी यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून प्रगती चाचणी घेण्यात येणार आहे.

याअंतर्गत येणारी पहिली पायाभूत चाचणी राज्यभरात एकाच वेळी 18 व 19 ऑगस्ट रोजी होणार आहे. पूर्वी फक्त मराठी व गणिताच्या चाचणी परिक्षा घेतली जात होती यंदापासुन त्यामध्येही बदल करुन सहावी पासुनपुढे विज्ञान व इंग्रजीचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी इयत्ता दुसरी ते आठवीचे 1 कोटी 40 लाख विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. तर इयत्ता नववीची नैदानिक चाचणीही याच दिवशी राज्यात पहिल्यांदाच घेण्यात येणार असून 20 लाख विद्यार्थी ही चाचणी देणार आहेत. विशेष बाब म्हणजे राज्यात सर्व शाळांमध्ये एकाच वेळी या परिक्षा होणार आहेत. यासाठी आवश्यक प्रश्नपत्रिका संबंधित शाळांना वेळेत पोहच करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षापासून राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी घेण्यात येत आहे. त्यांतर्गत पायाभूत चाचणी व संकलित मुल्यमापनाच्या दोन चाचण्या घेण्यात येत आहे. मात्र या चाचण्यांमध्ये यंदा बदल करण्यात आला असून नैदानिक ऐवजी प्रगती चाचणी असे नाव देण्यात आले आहे. तसेच नैदानिक चाचणी ही केवळ भाषा व गणित या विषयांची होत होती मात्र ही प्रगती चाचणी आता त्यापेक्षा अधिक विषयाची होणार आहे. यामध्ये इयत्ता दुसरीची भाषा व गणित, तिसरी ते पाचवीमध्ये प्रथम भाषा, गणित व इंग्रजीचा समवेश आहे. तर सहावी ते आठवीमध्ये भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञानाचाही समावेश आहे. इयत्ता दुसरी ते आठवीमधील प्रत्येक वर्गातील 20 लाख विद्यार्थी ही चाचणी देणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे गुण आजवर सरलमध्ये अपलोड केले जात होते मात्र आता ते केंद्रपातळीवर बनविण्यात आलेल्या ऍपवर अपलोड करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन दिसणार आहे. त्यामुळे विद्यार्थी गुणाकारात मागे आहे की व्याकरात पुढे आहे याची सर्व तपशीलवार माहिती मिळणार आहे.

इयत्ता नववीची नैदानिक चाचणीही यंदा पहिल्यांदाच घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी, तृतीय भाषा इंग्रजी, गणित व विज्ञान या चार विषयांची ही चाचणी असणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत पास करण्याचे धोरण अद्यापही सुरु असल्याचे नववीमधील या विद्यार्थ्यांचे चाचणीचे निकाल फार महत्त्वाचे असणार आहेत. 

Web Title: Pune news education student test