पुण्यातीलच वृद्ध कलावंत मानधनापासून उपेक्षित

सुशांत सांगवे
शनिवार, 23 डिसेंबर 2017

पुणे जिल्हा वृद्ध साहित्यिक- कलावंत निवड समितीची नुकतीच बैठक झाली. मानधनासाठी आलेले १३१ अर्ज बैठकीत ठेवण्यात आले. त्यातील साठ अर्ज समितीने निवडले. त्यांना पुढील महिनाभरात मानधन सुरू होईल. शहर आणि जिल्हा मिळून साठचा ‘कोटा’ पुण्यासारख्या ठिकाणी कमी आहे. तो १२० करावा, असा प्रस्ताव आम्ही सांस्कृतिक संचालनालयाला पाठवत आहोत.
- यशवंत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

पुणे - आपले आयुष्य कलेसाठी समर्पित केलेल्या कलावंतांना निवृत्तीच्या काळात आनंदाने जगता यावे, म्हणून सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या मानधनापासून पुण्यातीलच अनेक कलावंतांना उपेक्षित राहावे लागत आहे.

ज्येष्ठ कलावंतांकडून अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज येत असल्याने बहुतांश अर्ज बाजूला ठेवण्याची वेळ पुणे जिल्हा वृद्ध साहित्यिक- कलावंत निवड समितीवर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर समितीचे अध्यक्ष आणि अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यातील कलावंतांचा ‘कोटा’ वाढवून मिळावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

दरवर्षी वेगवेगळ्या वृद्ध कलावंतांना मानधन प्रक्रियेत सामावून घेतले जाते. त्यासाठी ‘कोटा’ पद्धतीनुसार साठ कलावंतच घेता येतात; पण मानधन मिळावे म्हणून येणाऱ्या अर्जांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे उर्वरित अर्ज बंद फाइलमध्ये ठेवण्याची वेळ समितीवर येत आहे. सरकारच्या ‘कोटा नियमा’मुळे बरेच गरजू असलेले वृद्ध कलावंत मानधनापासून वर्षानुवर्षे उपेक्षित राहत आहेत. त्यांची ही उपेक्षा थांबावी म्हणून सरकारच्या पुणे जिल्हा वृद्ध साहित्यिक- कलावंत निवड समितीनेच पुढाकार घेतला आहे.

समितीचे अध्यक्ष आणि अभिनेते विक्रम गोखले म्हणाले, ‘‘पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. इथे शास्त्रीय संगीत, साहित्य, नाटक, चित्र-शिल्प अशा वेगवेगळ्या कलांमध्ये आयुष्य समर्पित केलेल्या वृद्ध कलावंतांची संख्या इतर शहरांच्या तुलनेने जास्त आहे. शिवाय, अनेक कलावंत निवृत्तीनंतर पुण्यात येऊन स्थायिक होतात, त्यामुळे वृद्ध कलावंतांची संख्या पुण्यात जास्त आहे. या गोष्टीचा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विचार केला आणि सर्वानुमते वृद्ध कलावंतांचा पुण्याचा ‘कोटा’ वाढवून तो दुप्पट करावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यामुळे दरवर्षी अधिकाधिक कलावंतांना मानधन मिळणे सोपे जाईल.’’ कोटा वाढवून मिळाल्यास अनेक वृद्ध कलावंतांना न्याय मिळेल, असे समितीचे सदस्य शाहीर हेमंत मावळे यांनी सांगितले.

१,७२४ - मानधन मिळत असलेल्या पुण्यातील ज्येष्ठ कलावंतांची सध्याची संख्या

सरकारकडून दरमहा मिळणारे मानधन
अ. - २,१०० रुपये
ब. - १,८०० रुपये
क. - १,५०० रुपये

Web Title: pune news The elderly artist of Pune neglected honor