महावितरण देणार इलेक्‍ट्रिक चार्जिंगची सुविधा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पुणे - 'भविष्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. हे विचारात घेऊन येत्या तीन वर्षांत पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतील महावितरणच्या पाचशे सर्व्हिस स्टेशनमध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी रिचार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक दहा ते पंधरा किलोमीटरमध्ये ही सोय उपलब्ध होईल,'' अशी माहिती राज्याचे महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी बुधवारी दिली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चर यांच्या वतीने आयोजित केलेल्या "राष्ट्रीय अपारंपरिक ऊर्जा' परिषदेचे उद्‌घाटन कुमार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी चेंबरचे महाव्यवस्थापक अनंत सरदेशमुख आणि महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

राज्यात मोक्‍याच्या ठिकाणी ही सर्व्हिस स्टेशन आहेत. ती आमच्या मालकीची नसून आम्ही त्यांचे "कस्टोडियन' आहोत. त्याचा वापर नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठीच झाला पाहिजे. त्यामुळे या सर्व्हिस स्टेशनवर रिचार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सांगून कुमार म्हणाले, 'महावितरणचे राज्यातील एकूण ग्राहकांपैकी सत्तर टक्के ग्राहक अनुदानित ग्राहक आहेत, त्यामुळे उर्वरित तीस टक्के ग्राहकांवर त्यांचा बोजा टाकावा लागतो. पुणे शहरात तीस टक्के ग्राहक हे शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरतात, तर वीस टक्के वीस युनिटपेक्षा कमी वीज वापरतात. एवढा कमी वापर कसा करतात, याबाबतचे आश्‍चर्य वाटते.''

वीज वितरणात आमची एकाधिकारशाही आहे. स्पर्धा नसल्यामुळे गुणवत्तेकडे म्हणावे तसे आजपर्यंत लक्ष दिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

कुमार म्हणाले, 'देशाच्या तुलनेत विजेबाबत महाराष्ट्राची चांगली स्थिती आहे. त्यामुळे या क्षेत्रात आणखी सुधारणा करण्याची संधी आहे. सौरऊर्जा वापरण्यात महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. राज्यात दिवस आणि रात्रीच्या विजेच्या मागणीत मोठी तफावत आहे. दिवसभरात 18 हजार मेगावॉट, तर रात्रीच्या वेळेस 11 हजार 500 मेगावॉट विजेची मागणी असते. विजेची मागणी करणाऱ्यांना एकूण मागणीच्या बारा टक्के अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचे बंधन घातले आहे. भविष्यात हे प्रमाण वीस टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याचा विचार आहे. सध्या दहा हजार मेगावॉटपैकी वाऱ्यापासून सहा हजार, तर बायोगॅस आणि सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रत्येकी दोन हजार मेगावॉट विजेची निर्मिती होते. निर्माण होणारी अपारंपरिक ऊर्जा साठवून ठेवण्याचे कोणतेही साधन नाही, ही आमच्यापुढील मोठी समस्या आहे.'' या वेळी अनंत सरदेशमुख यांचेही भाषण झाले.

नेटमीटरिंग धोरणाविरोधात
नेटमीटरिंगविषयीच्या प्रश्‍नांवर संजीव कुमार म्हणाले, 'नेटमीटरिंग हे संपूर्णतः महावितरणच्या धोरणाविरोधात आहे, त्यामुळे ते महावितरणला मारक आहे. तरीदेखील त्याला चालना देण्याचे काम आम्हाला करावे लागत आहे.''

Web Title: pune news electric charging facility by mahavitaran