पुणे - मध्यवर्ती भागातील वीज गायब 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे - जेसीबीने साफसफाई करत असताना दत्तवाडी येथील महापारेषणची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासाठी वीजपुरवठा करणारी सहा उपकेंद्रे गुरुवारी (ता. 21) बंद पडली. परिणामी रास्ता पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, गुरुवार पेठेसह लुल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, सिंहगड रस्ता, कॅम्प, मार्केट यार्ड, स्वारगेट परिसरातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. 

दरम्यान, इतर उपकेंद्रांद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न महावितरणकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तथापि, 70 ते 80 मेगावॉट विजेचे भार व्यवस्थापन शक्‍य नसल्याने या सर्व परिसरात पुढील दोन दिवस नाईलाजास्तव 3 ते 4 तासांचे चक्राकार पद्धतीने तात्पुरते भारनियमन करावे लागणार असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले. 

महापारेषणच्या पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातून भूमिगत वीजवाहिनीद्वारे रास्ता पेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. या उपकेंद्रातील वाहिन्यांद्वारे महावितरणच्या सेंटमेरी, कसबा पेठ, मंडई परिसर, लुल्लानगर, गुलटेकडी, रास्ता पेठ या सहा उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येतो; परंतु बुधवारी (ता. 20) रात्री दत्तवाडी येथे महापालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या कामामुळे महापारेषणच्या भूमिगत वीजवाहिनीचे नुकसान झाले. 

त्यातच पाऊस पडल्याने भूमिगत वाहिनीमध्ये आर्द्रता वाढली. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास तेथे स्फोट झाला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. 

परिणामी या उपकेंद्रातून महावितरणच्या 6 उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा खंडित झाला. 

विजेचा कमीत कमी वापर करा 

वाहिनीच्या दुरुस्तीसाठी आवश्‍यक जाइंट चेन्नई येथून विमानाने मागविण्यात आला आहे. या दुरुस्तीचे काम शुक्रवारी (ता. 22) सुरू होईल. भारनियमन टाळण्याचा किंवा त्याचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्राहकांनी विजेचा वापर कमीत कमी करावा. उद्योजक, व्यावसायिकांनी विजेऐवजी शक्‍य असल्यास जनरेटरचा वापर करावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे. 

गुरुवारी दुपारी अडीचपासून खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत झाला नाही. कंत्राटदाराच्या बेजबाबदार कामामुळे भूमिगत वीजवाहिनी तुटली असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. 
- रवी सहाणे, नागरिक 

Web Title: pune news electricity