वीजबिलांची माहिती "एसएमएस'द्वारे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

महावितरणकडून पुणे परिमंडळात 21 लाख 77 हजार ग्राहकांना सेवा

महावितरणकडून पुणे परिमंडळात 21 लाख 77 हजार ग्राहकांना सेवा
पुणे - महावितरणकडून वीजबिलांची तपशील व इतर माहिती ग्राहकांच्या मोबाईलवर "एसएमएस'द्वारे पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या 21 लाख 77 हजार ग्राहकांना ही सेवा सुरू केली आहे. दरम्यान, ग्राहकांनी मागणी केल्यास त्यांना मराठी भाषेतून "एसएमएस' उपलब्ध होणार आहे.

परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीत 25 लाख 59 हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी 21 लाख 77 हजार वीजग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. तर 1 लाख 12 हजारांपैकी 67,755 कृषिपंपधारकांनी, तसेच इतर 13752 पैकी 10457 वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे.

सद्यःस्थितीत "एसएमएस'द्वारे ग्राहक क्रमांक व बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, विविध कारणांमुळे मीटर रीडिंग घेता न आल्यास ग्राहकांनी महावितरण मोबाईल ऍपद्वारे हे रीडिंग पाठविण्याची विनंती, तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना "एसएमएस'द्वारे कळविण्यात येत आहे. याशिवाय आता "एसएमएस'द्वारे मिळालेल्या तपशिलावरून वीजग्राहकांना बिल भरणे शक्‍य झाले आहे.

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर "एसएमएस'द्वारे वीजग्राहकांना स्वतःचा ई-मेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी 9225592255 क्रमांकाला MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) (वीजग्राहकाचा ई-मेल) अशी माहिती टाइप करून एसएमएस केल्यास ई-मेल आयडीची नोंदणी होईल. तसेच नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून "एसएमएस' केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. याशिवाय कॉल सेंटरचे 1912 किंवा 18002003435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ऍपवर मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

मराठीतील "एसएमएस'साठी
महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाऊन "एसएमएस' दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेतूनही "एसएमएस'ची सेवा महावितरणने सुरू केली आहे. "एसएमएस'ची भाषा बदलण्यासाठी मराठीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) 1, तर इंग्रजीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) 2 असे टाइप करून 9225592255 या क्रमांकावर "एसएमएस' पाठवावा.

Web Title: pune news electricity bill information by sms