मुठा नदीचा गुदमरतोय ‘श्‍वास’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पूररेषेतील राडारोडा, डांबर, सिमेंटचे ब्लॉक

पुणे - एकेकाळी मोकळेपणाने वाहणाऱ्या मुठा नदीचा ‘श्‍वास’ गुदमरतोय तो नदीपात्र आणि लगतच्या पूररेषेतील बांधकामाचा राडारोडा, डांबर आणि सिमेंटचे ब्लॉक, मातीच्या भल्यामोठ्या थरांमुळे. एवढेच नव्हे तर, हॉटेलमधील कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि सांडपाणी थेट नदीतच

सोडले जात आहे. त्यामुळे मुठेची अवस्था अधिक दयनीय झाल्याची स्थिती विकास आराखड्यात (डीपी) समावेश असलेल्या म्हात्रे पूल ते राजाराम पुलापर्यंतच्या रस्त्यालगतच्या नदीपात्रात दिसून आली. 

पूररेषेतील राडारोडा, डांबर, सिमेंटचे ब्लॉक

पुणे - एकेकाळी मोकळेपणाने वाहणाऱ्या मुठा नदीचा ‘श्‍वास’ गुदमरतोय तो नदीपात्र आणि लगतच्या पूररेषेतील बांधकामाचा राडारोडा, डांबर आणि सिमेंटचे ब्लॉक, मातीच्या भल्यामोठ्या थरांमुळे. एवढेच नव्हे तर, हॉटेलमधील कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि सांडपाणी थेट नदीतच

सोडले जात आहे. त्यामुळे मुठेची अवस्था अधिक दयनीय झाल्याची स्थिती विकास आराखड्यात (डीपी) समावेश असलेल्या म्हात्रे पूल ते राजाराम पुलापर्यंतच्या रस्त्यालगतच्या नदीपात्रात दिसून आली. 

नदीपात्र, त्यालगतचा हरित पट्टा (ग्रीन बेल्ट) आणि पूररेषेत भराव घालून येथील जागेत व्यवसाय थाटले आहेत. या परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्र अतिक्रमणांनी व्यापत असून, परिणामी, मुठा नदी लुप्त होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

महापालिकेच्या हद्दीतून सुमारे ४४ किलोमीटर लांबीचा मुठा नदीचा प्रवाह वाहतो. हरित पट्टा आणि पूररेषेमुळे नदीपात्रालगतच्या परिसरात बांधकामांना परवानगी नाही; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून कर्वेनगर, वारजे आणि ‘डीपी’ रस्त्यालगत नदीपात्रातलगत शेकडो ट्रक भूभराव आणि राडारोडा टाकून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यावर अनेक ठिकाणी छोटे-मोठे उद्योगधंदे उभारण्यात आले असून, विशेषतः हॉटेल व्यवसायासाठी येथील जागेचा वापर होत असल्याचे दिसत आहे. त्याकरिता, काही प्रमाणात बांधकामे केली असून, अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड उभारले आहेत. नदीपात्रालगत मोकळी जागा असेल त्या ठिकाणी भराव घालण्याचा उद्योग अजूनही काही मंडळी राजरोसपणे करीत आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पाठिंब्यामुळेच, बेकायदा व्यवसाय थाटले जात आहेत. ‘डीपी’ रस्त्याच्या परिसरात अक्षरशः नदीपात्राला लागूनच भराव टाकल्याचे पाहणीत आढळून आले. 

बेकायदा राडारोडा टाकणाऱ्या ट्रकचालकांना अडवून महापालिका आणि संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारीही करण्यात आल्या आहेत; परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यानेच मुठा नदीचा ‘श्‍वास’ कोंडल्याचे परिस्थितीवरून दिसून आले. 

पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवाडकर म्हणाले, ‘‘नदीकाठच्या हरित पट्ट्याचा व्यावसायिक कारणांसाठी बेकायदा वापर सुरू आहे. या भागात गेल्या पाच ते सात वर्षांत बेकायदा बांधकामे झाली आहेत. ती अजूनही सुरूच आहे. त्यासाठी सर्वत्र राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यामुळे साधारणतः वीस फूट उंच जमीन तयार करण्यात आली आहे. त्यावर हॉटेल उभारले आहेत. हरित पट्ट्यातील अतिक्रमणांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तक्रारी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट येथील व्यावसायिकांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळेच बेकायदा व्यावसायिकांचे धाडस वाढत आहे.’’

महापालिकेकडून कारवाई नाही
मुठा नदीपात्रात आजघडीला मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असून, भराव आणि राडारोडा टाकून या जमिनींचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत आहे. त्यात काही बांधकाम व्यावसायिकांचा हात आहे. काही ठिकाणी बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या असून, त्या भाडेतत्त्वावर दिल्या जात आहेत.अशाप्रकारे बेकायदा अतिक्रमणे करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन कारवाई करीत नाही, अशी तक्रार नगरसेवक सुशील मेंगडे यांनी केली.

Web Title: pune news encroachment in mutha river