एव्हरेस्टवीराच्या कथेला प्रश्‍नपत्रिकेत स्थान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

एव्हरेस्टची मोठी नागरी मोहीम आयोजित करण्यामागे गिर्यारोहणाला चालना देण्याचा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत साहसाचा संदेश नेण्याचा उद्देश होता. कांचाच्या कथेची अशी नोंद घेतली जाणे गिर्यारोहणाचाच सन्मान आहे.
- उमेश झिरपे, गिरिप्रेमीचे लीडर

पुणे - नेपाळच्या राजघराण्यात २००१ मध्ये झालेल्या खळबळजनक हत्याकांडानंतर देशभर अस्थिर वातावरण निर्माण झाले असताना एक नेपाळी किशोर भारतातील गंगोत्री परिसरातील सुदर्शन गिर्यारोहण मोहिमेत पोर्टर म्हणून काम करीत होता. त्याच सुमारास आजारी पडलेल्या या मुलाला मायदेशात परतणे धोक्‍याचे वाटत होते. त्यामुळे त्याला मोहिमेचा लीडर उमेश झिरपे यांनी पुण्यात आणले. एका दशकात हा मुलगा एव्हरेस्टवीर बनला. आता त्याच्या या फिल्मी कहाणीवर परीक्षेत प्रश्नाचाही योग आला.

टेकराज अधिकारी ऊर्फ कांचा असे या युवकाचे नाव आहे. गिरीप्रेमीने २०१२ मध्ये आखलेल्या एव्हरेस्टच्या नागरी मोहिमेत कांचाने शिखर सर केले. त्याच्याविषयी बृहन्‌ महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये (बीएमसीसी) अकरावी इंग्रजीच्या सोमवारी पार पडलेल्या ८० गुणांच्या परीक्षेत १२ गुणांचा प्रश्न होता. तीन परिच्छेद वाचून त्यावर वेगवेगळ्या ॲक्‍टिव्हिटी देण्यात आल्या.

कांचाची कथा थरारक आहे. पुण्यात आल्यावर झिरपे यांनी कांचाच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्याला तूर्त तिथेच ठेवा असे त्यांनी कळविले. झिरपे यांच्या कार्यालयात हाच कांचा सहाय्यक म्हणून काम करताना तो संगणक आणि मराठीसुद्धा शिकला. दरम्यानच्या काळात त्याने गिर्यारोहणाचे कोर्स केले. ही वाटचाल शब्दबद्ध करीत त्यावर चूक की बरोबर, गिर्यारोहण कोर्स करण्याचे फायदे, असे प्रश्न विचारण्यात आले.

Web Title: pune news everest story question paper