द्रुतगती महामार्गावरील १२ किमीचे काम रखडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील १२ किलोमीटर लांबीच्या रस्ता रुंदीकरणाचे काम वनखात्याच्या मंजुरीअभावी रखडले आहे. त्यामुळे या कामासाठी मंजूर झालेला निधी गेल्या एक वर्षापासून तसाच पडून आहे. वनखात्याकडून परवानगी मिळत नाही, तोपर्यंत वाहनचालकांना या दरम्यानच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.   

मुंबई-पुणे हा महामार्ग हा ९५ किलोमीटर लांबीचा असून सहापदरी आहे. यामधील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या भागातील राहिलेल्या १२ किलोमीटर भागाचे काम द्रुतगती मार्ग बांधतेवेळी पर्यावरणविषयक बाबींमुळे हाती घेण्यात आले नव्हते. या भागात द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ यांच्या मार्गिका सामाईक असल्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गाचे (मिसिंग लिंक) बांधकाम करण्याच्या प्रस्तावास शासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये मान्यता दिली. त्यामध्ये दोन बोगदे आणि दोन पुलांसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम आहे. या कामासाठी ३ हजार २१५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

मिसिंग लिंकमधील काही भाग वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने त्यास वन विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. त्याच्या मान्यतेसाठी ही फाइल सहा महिन्यांपूर्वीच दाखल करण्यात आली. मात्र अद्याप त्यास मान्यता मिळालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या मिसिंग लिंकचे काम सुरू करता आले नाही. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून रोज हजारो वाहने जातात. घाटात अपघात झाल्यास तसेच सुटीच्या दिवशी महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. त्यामध्ये या मिसिंग लिंकच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले होते. मात्र वनखात्यामुळे हे काम रखडले आहे.

Web Title: pune news express way 12 km work stop