शेतकऱ्यांची "दिल की बात' ओळखा - रघुनाथ पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

पुणे - ""शेतकऱ्यांच्या अवस्थेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. स्वतःची "मन की बात' रेडिओवर बोलण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांची "दिल की बात' ओळखली पाहिजे. शेतकऱ्यांच्या "मन की बात' मोदी ओळखत नाही, तोपर्यंत "अच्छे दिन' येणार नाहीत'', असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले. याबरोबरच त्यांनी शेतकरी संघटनेच्या नव्या पक्षाची घोषणा करत देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देशभर आंदोलन छेडणार असल्याचे जाहीर केले. 

"शेतकरी संघटने'तर्फे आयोजित "राष्ट्रीय किसान परिषदे'च्या समारोपप्रसंगी पाटील बोलत होते. परिषदेचा समारोप शनिवारवाड्यावर सभेने झाला. हुतात्मा बाबू गेनू आणि शरद जोशी यांच्या स्मरणार्थ ही परिषद घेण्यात आली. लालबहादूर शास्त्री यांचे नातू संजयनाथ सिंग, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, कर्नल सुरेश पाटील (निवृत्त), शेतकरी नेते लीलाधर राजपूत, समशेरसिंग दहिया, किशोर ढमाले, गणेश जगताप, सुश्‍मिता सोरेन, बलविंदरसिंग बाजवा असे 22 राज्यांतील शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. 

यानिमित्ताने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहापासून शनिवारवाड्यापर्यंत मोर्चा काढला. यात बैलगाडी आणि ट्रॅक्‍टरसह शेतकरी सहभागी झाले होते. हातात मशाल घेऊन आणि हलगी वाजवत शेतकऱ्यांनी आपले विविध प्रश्‍न मांडले. शनिवारवाड्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटिसांची आणि वीज बिलांची होळी करण्यात आली. 

पाटील म्हणाले, ""सर्वांगीण शिक्षण, सक्षम कायदे आणि शेतीला मुबलक पाणी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यासाठी पुण्यातील तरुण उपोषणही करणार आहेत. सरकारचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही.'' 

संजयनाथ सिंग म्हणाले, ""आज प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले जाते. हे थांबायला हवे. विकासाच्या मागे धावणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचाही विसर पडला आहे. शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन काम करावे.'' 

सोरेन म्हणाल्या, ""शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला आणि युवकांनी एकत्र यायला हवे. आपल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. ही न्यायाची लढाई एक दिवस शेतकरी नक्कीच जिंकेल.'' 

Web Title: pune news farmer raghunath patil