उद्विग्न बळिराजाचा उद्रेक...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

पुणे - संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आणि दुधाला प्रतिलिटर ५० रुपये दर देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून पुकारलेल्या संपाला पुणे जिल्ह्यात मोठा पाठिंबा मिळाला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी दूध, फळे, पालेभाज्या, फळभाज्या रस्त्यावर फेकून दिला. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा जोरदार निषेध करण्यात आला. या संपामुळे जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले. 

पुणे - संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आणि दुधाला प्रतिलिटर ५० रुपये दर देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून पुकारलेल्या संपाला पुणे जिल्ह्यात मोठा पाठिंबा मिळाला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी दूध, फळे, पालेभाज्या, फळभाज्या रस्त्यावर फेकून दिला. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा जोरदार निषेध करण्यात आला. या संपामुळे जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले. 

पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध आणि फळे रस्त्यावर फेकून दिल्याने, रस्त्यावर दूध व शेतमालाचा चिखल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 
या आंदोलनामुळे जिल्ह्यातील नियोजित आठवडे बाजार; तसेच बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट होता. नेहमी विक्रीसाठी आणला जाणारा भाजीपाला बाजारात न आणता रस्त्यावर फेकून देत सरकारचा निषेध करण्यात येत होता. आठवडे बाजारात दाखल झालेल्या भाजीपाला, फुले आणि फळविक्रेत्यांनाही सन्मानाने बाजारातून बाहेर काढण्याचे काम शेतकऱ्यांनी केले. यासाठी काही ठिकाणी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आणलेल्या व्यापाऱ्यांचा गुलाब फूल देऊन ‘गांधीगिरी’ पद्धतीने निषेध करण्यात आला.

जुन्नर बाजार समितीतील सर्व लिलाव बंद

नारायणगाव : शेतकऱ्यांच्या संपाला गुरुवारी जुन्नर तालुक्‍यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी फळ आणि भाजीपाला विक्रीसाठी न आणल्याने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगाव, आळेफाटा व ओतूर येथील फळ भाजीपाल्याचे लिलाव गुरुवारी बंद ठेवले होते. यामुळे नेहमी गजबजलेल्या उपबाजारात शुकशुकाट जाणवत होता. 

नारायणगाव उपबाजारात सध्या रोज कोथिंबीर, मेथी व शेपूच्या सुमारे तीन लाख जुड्यांची व टोमॅटोच्या पंचवीस हजार क्रेटची आवक होत होती. भाजीपाला व टोमॅटो खरेदी-विक्रीतून उपबाजारात रोज सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होते. बाजार समितीच्या ओतूर येथील भाजीपाला उपबाजारात रोज सुमारे सात हजार डागांची (३५० टन) आवक होत होती. भाजीपाला विक्रीतून रोज सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. आळेफाटा येथील डाळिंब व कांदा उपबाजारात खरेदी-विक्रीतून रोज सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. तालुक्‍यात सुमारे १०५ दूध उत्पादक संस्था आहे. दुधाची वाहतूक करणे शक्‍य नसल्याने गुरुवारी बहुतेक दूध संस्थांनी दुधाचे संकलन केले नाही.

दोन टॅंकरमधील दूध राजगुरुनगरमध्ये ओतले 
राजगुरुनगर - शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर (ता. खेड) येथील चांडोली टोलनाक्‍याजवळ आंदोलकांनी दुधाचे दोन टॅंकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून दिले. कर्नाटक राज्यातून दुधाचे दोन टॅंकर मंचर येथील गोवर्धन डेअरीकडे निघाले होते. चांडोली टोलनाक्‍यावर २५ ते ३० शेतकरी आंदोलक थांबलेले होते. त्या वेळी पुण्याकडून येणारा पहिला टॅंकर टोल भरून पुढे आल्यानंतर आंदोलक त्या बाजूला गेले आणि त्यांनी चालकाला टॅंकर बाजूला घ्यावयास लावला. टॅंकर थांबताच टाकीची तोटी उघडून सर्व दूध रस्त्यावर ओतून दिले. 

Web Title: pune news farmer strike