नारायणगावात टोमॅटोचे भाव निम्म्यावर; शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

30 हजार क्रेटची आवक 

येथील उपबाजारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाली. परिणामी बाजारभावात 50 टक्‍क्‍यांनी घट झाली. टोमॅटोच्या बाजारभावात नुकतीच वाढ झाली होती. क्रेटला (वीस किलोग्रॅम) प्रतवारीनुसार शंभर ते तीनशे रुपये भाव मिळत होता.

नारायणगाव : शेतकरी गुरुवारपासून (ता. 1 जून) संपावर जाणार असल्याने जुन्नर बाजार समितीच्या येथील टोमॅटो उपबाजारात आज मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाली. या मुळे टोमॅटोच्या बाजारभावात पन्नास टक्के घट झाली. 
सायंकाळी सहानंतर टोमॅटोची खरेदी व्यापाऱ्यांनी बंद केल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. 

कर्ज माफीसह इतर मागण्यांसाठी 1 जून पासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मुळे गुरुवारपासून शेतकरी भाजीपाला तोडणी व विक्री बंद ठेवणार आहेत. भाजीपाल्याची वाहतूक करता येणार नसल्याने नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी सुद्धा टोमॅटो खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुळे येथील उपबाजारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाली. परिणामी बाजारभावात 50 टक्‍क्‍यांनी घट झाली. टोमॅटोच्या बाजारभावात नुकतीच वाढ झाली होती. क्रेटला (वीस किलोग्रॅम) प्रतवारीनुसार शंभर ते तीनशे रुपये भाव मिळत होता.

शेतकरी संपावर जाणार असल्याने भाजीपाल्याची तोडणी व विक्री बंद राहणार आहे. या मुळे येथील उपबाजारात आज सुमारे तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. आज दुपार पर्यंत व्यापाऱ्यांनी शंभर रुपये ते दीडशे रुपये क्रेट या बाजारभावाने टोमॅटोची खरेदी केली. टोमॅटोच्या बाजारभावात आज अचानक मोठी घट झाल्याने उत्पादकांनी संताप व्यक्त केला. लांबच्या बाजारपेठेत टोमॅटो विक्रीसाठी पाठवता येणार नसल्याने सायंकाळी सहानंतर व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी बंद केली. या मुळे विक्रीसाठी आणलेला टोमॅटो पुन्हा माघारी घेऊन जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. या मुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यातील उत्पादकांना आज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

Web Title: pune news farmers strike affected tomato rates