देशाच्‍या रक्षणासाठी प्राणपणाने लढणार

देशाच्‍या रक्षणासाठी प्राणपणाने लढणार

पुणे - देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढण्याची घरातील परंपरा पुढे चालविण्याचा निर्धार लष्करात नव्याने अधिकारी म्हणून रुजू होणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) कॅडेटनी बुधवारी व्यक्त केला. ‘क्‍वीन ऑफ बॅटल’ असलेल्या इन्फंट्रीलाच या अव्वल विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले असल्याचेही त्यांच्याशी साधलेल्या संवादातून स्पष्ट झाले. 

विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या डिव्हिजन कॅडेट कॅप्टन गुरुवंशसिंग गोसल, संगणक विज्ञानात पहिला आलेला बटालियन कॅडेट ॲज्युनंट अनमोल अग्रहारी आणि कला शाखेत अव्वल ठरलेला डिव्हिजन कॅडेट कॅप्टन राहुल बिष्ट यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यातून ही माहिती पुढे आली. 

गुरुवंश सिंग गोसल आणि राहुल बिष्ट हे इन्फंट्रीमध्ये रुजू होणार आहेत. त्याबद्दल बोलताना गोसल म्हणाला, ‘‘इन्फंट्री ही युद्धात कायम पुढे असते. अशा आघाडीवर असलेल्या ठिकाणी काम करण्याला मी प्राधान्य दिले आहे. देशाचे नंदनवन असलेल्या जम्मू आणि काश्‍मीर, तसेच ईशान्य भारतातील सीमांचे रक्षण करण्याची इच्छा मनात ठेवून ही पदवी घेत आहे.’’

लष्करातील पॅरा रेजिमेंटमध्ये सेवा करणाऱ्या वडिलांचा देशसेवेचा वारसा मी पुढे घेऊन जात असल्याचा आनंद होत असल्याचे सांगून बिष्ट म्हणाला, ‘‘गेल्या तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणात खूप काही गोष्टी शिकता आल्या. ‘एनडीए’मध्ये येताना आणि आता येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडत असताना यात स्वतःमध्ये खूप बदल झाल्याचे जाणवते. प्रत्येक गोष्टीत आमूलाग्र बदल झाला आहे. देशातील अशांत भागात सेवा करून देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी इन्फंट्रीत जाण्याचा निर्धार केला आहे.’’

भारतीय नौदलातील अधिकारी असलेल्यांचा वडिलांचा वारसा मला पुढे चालवायचा आहे. त्यामुळे नौदलाची निवड केल्याचे सांगत अनमोल म्हणाला, ‘‘लहानपणापासून मी लष्कराची शिस्त बघत होतो. या शिस्तीत वाढल्याने याबद्दल एक आकर्षण होते. त्यामुळे या गणवेशातील सेवेत दाखल होण्याची जिद्द लहानपणापासून होती. या निमित्ताने ते स्वप्न आता पूर्ण होत आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com