कोणतेही संकट पेलण्यास नौदल सज्ज - ऍडमिरल लांबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

पुणे - 'स्वदेशी बनावटीच्या 41 युद्धनौका आणि पाणबुड्या बनवल्या जात आहेत. त्या लवकरच लष्करी सेवेत दाखल होतील. आपण स्वदेशी नौका बनविण्यावर पूर्वीपासूनच भर देत आलो आहोत. त्या अर्थाने आपण 1960 पासूनच "मेक इन इंडिया'च्या वाटेवर आहोत. देशाच्या नौदलाची ताकद कुठलेही संकट पेलण्यासाठी सतत वाढविली जात असून, भारतावर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला झाला, तर आपण पूर्णत: तयार आहोत,'' असा विश्‍वास भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी आज व्यक्त केला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 132 व्या तुकडीच्या आज झालेल्या दीक्षान्त संचलनानंतर लांबा प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ""भारतीय नौदलाची शक्ती वाढली असून, प्रशांत महासागर ते अटलांटिक महासागर असा दीर्घ पल्ला आपण गाठला आहे. सैन्याची एकच शाखा युद्ध कधीही जिंकू शकत नाही. त्यासाठी नौदल, पायदळ आणि वायुदल यांनी एकत्र येऊनच युद्ध लढले पाहिजे. तिन्ही दलांची एकत्र ताकदच आपल्याला अजिंक्‍य बनवेल. यासाठी तिन्ही दलांचा एकत्र सराव लवकरच सुरू करण्यात येणार आहे.''

आएनएस विराट युद्धनौकेबाबत विचारले असता, ही युद्धनौका आता नौदलात कार्यरत नसल्यामुळे तिच्यासंदर्भात वस्तुसंग्रहालय बनविण्याचा किंवा इतर कुठलाही निर्णय व्हायचा असल्याचे लांबा यांनी सांगितले.

"मी 1974 मध्ये एनडीएमध्ये दाखल झालो होतो. त्यानंतरची माझी शिक्षणाची पुढील तीन वर्षे माझ्यासाठी आजही अविस्मरणीय आहेत,' असे सांगत लांबा यांनी एनडीएतील आपल्या आठवणी जाग्या केल्या.
 

'सेवा परमो धर्मः' हा मंत्र विसरू नका
'खडतर प्रशिक्षण हेच आपल्याला कठिणातील कठीण आव्हानासाठी सज्ज करत असते, हे लक्षात ठेवा. शिस्त, धाडस, चिकाटी यांना पर्याय नाही. तुम्हाला पुढील आयुष्यभर याचा उपयोग होणार आहे. आपल्यासाठी देश प्रथम असायला हवा, हे कधीही विसरू नका. लक्षात ठेवा- देशाची सेवा करताना कोणताही प्रयत्न लहान नाही आणि कोणतेही बलिदान अत्युच्च नाही ! "सेवा परमो धर्मः' हा मंत्र कधीही विसरू नका आणि मानवतेसाठी सदैव सज्ज राहा. येत्या आव्हानाचा काळात सकारात्मक दृष्टिकोन हाच तुमचा खरा वाटाड्या असेल,'' असा कानमंत्र ऍडमिरल सुनील लांबा यांनी या वेळी स्नातकांशी बोलताना दिला.

Web Title: pune news Fighter is ready to face any crisis