फूल बाजाराचा खर्च वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पुणे - दीड वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फूल बाजाराच्या कामात प्रगती येऊ लागली आहे. दरम्यान, या प्रकल्पास विविध कारणांमुळे विलंब झाला होता. त्यामुळे त्याचा खर्च वाढण्याची शक्‍यता आहे. 

पुणे - दीड वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फूल बाजाराच्या कामात प्रगती येऊ लागली आहे. दरम्यान, या प्रकल्पास विविध कारणांमुळे विलंब झाला होता. त्यामुळे त्याचा खर्च वाढण्याची शक्‍यता आहे. 

मार्केट यार्ड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा फूल बाजार  उभारण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीत या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर झाडे तोडणे, त्यांच्या पुनर्रोपणास परवानगी मिळण्यास झालेला उशीर, पाया खोदताना पाण्याचा झराही आढळला होता. तेथे जास्त माती खोदल्यामुळे बाजार समितीला झालेला दंड अशा विविध कारणांमुळे या कामास उशीर झाला होता. मात्र, सध्या या कामाला गती देण्यात येत आहे. बाजाराच्या पायाच्या ठिकाणी चार फूट उंचीचे ‘फुटिंग’ तयार केले आहे. सिमेंट काँक्रीटचे मिश्रण तयार करण्यासाठी यंत्रणा उभारली असून, बाहेरूनही आवश्‍यकतेनुसार हे मिश्रण मागविले जात आहे. बाजूच्या भिंतींचे ‘कास्टिंग’ केले जात आहे. पुढील काही दिवसांत पहिला ‘स्लॅब’ उभारण्याच्या कामास सुरवात होईल, असा विश्‍वास बाजार समितीच्या प्रशासनाला आहे. 

हा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण करावा, अशी अपेक्षा तत्कालीन सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली होती; परंतु प्रत्यक्षात काम सुरू होण्यास सहा महिन्यांहून अधिक काळ गेला. महापालिकेकडूनही बांधकाम परवाना वेळेत मिळू शकला नाही. त्यातच आणखी दोन मजले वाढविण्याचा प्रस्ताव बाजार समितीने मंजूर केला आहे. त्यामुळे या वाढीव बांधकामासाठी पालिकेकडून तर पणन मंडळाकडून खर्चाची परवानगी घ्यावी लागणार आहे. सध्या पायाचे काम सुरू असून दोन मजली पार्किंग, गाळे, लिलावाचा हॉल आणि अडत्यांची कार्यालये उभे राहतील. कामास वेगाने सुरवात झाली असली तरी ते पूर्ण होण्यास दोन वर्षाहून अधिक काळ लागू शकेल असा अंदाज अडते व्यक्त करीत आहे. 

या कामासाठी ५६ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. निविदा काढल्यानंतर १८ महिन्यांच्या मुदतीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. लवकरच पहिला स्लॅब टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
- दिलीप खैरे, मुख्य प्रशासक, बाजार समिती

Web Title: pune news flower market

टॅग्स