माजी आमदार चंदुकाका जगताप यांचे निधन

श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 29 जानेवारी 2018

सासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी चं. जगताप या त्यांच्या पत्नी, तर पु्णे स्मार्ट सिटीचे सीईअो राजेंद्र जगताप व पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप हे त्यांचे चिरंजीव होत. त्यांना राणी व सोनल या दोन कन्याही आहेत. अत्यंत गरीबीतून व कष्टातून चंदुकाका जगताप यांनी प्रगती केली. पूर्वीपासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. सासवडमधील कन्हय्या मंडळाच्या स्थापनेपासूनच ते सामाजिक कामात उतरले.

सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) : माजी आमदार व राज्य सहकार परीषदेचे (मंत्री दर्जा) माजी अध्यक्ष चंद्रकांत निवृत्ती उर्फ चंदुकाका जगताप (वय 70) यांचे मध्यरात्री दिर्घ आजारानंतर निधन झाले. प्रकृती खालावल्याने ते गेली काही दिवस पुणे येथे रुग्णालयातच होते. मध्यरात्री 12.15 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज (ता. 29) सकाळी साडेसात वाजता त्यांचे पार्थिव सासवड (ता. पुरंदर) येथील निवासस्थानी आणले. तेंव्हापासून नागरीकांची दर्शनार्थ गर्दी झाली आहे.

सासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी चं. जगताप या त्यांच्या पत्नी, तर पु्णे स्मार्ट सिटीचे सीईअो राजेंद्र जगताप व पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप हे त्यांचे चिरंजीव होत. त्यांना राणी व सोनल या दोन कन्याही आहेत. अत्यंत गरीबीतून व कष्टातून चंदुकाका जगताप यांनी प्रगती केली. पूर्वीपासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. सासवडमधील कन्हय्या मंडळाच्या स्थापनेपासूनच ते सामाजिक कामात उतरले. 1985 ते 1992 दरम्यान व पुन्हा 2002 ते 2007 दरम्यान ते सासवडचे नगराध्यक्ष होते. जिल्हा बँकेचे संचालकपद त्यांनी 1985 पासून आतापर्यंत 7 वेळा मिळविले. सन 2004 मध्ये सात महिन्यांसाठी ते पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परीषदेवर निवडुण गेले होते. तर सन 2008 मध्ये तीन वर्षांसाठी त्यांची राज्य सहकार परीषदेचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष होते.

संत सोपानकाका सहकारी बँक व पुरंदर मिल्क कंपनीचे ते संस्थापक होते. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे व पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. सासवड शहराच्या विकासात त्यांनी 12 वर्षे नगराध्यक्ष म्हणून उल्लेखनिय असे काम केले. गेली कित्येक काळापासून आतापर्यंत त्यांच्याच नेतृत्वाखालील जनमत विकास आघाडी सासवड पालिकेच्या सत्तेत आहे. सासवडची वीर धरणाहून झालेली सुमारे 18 कोटींची तातडीची पाणी योजनाही त्यांच्याच पुढाकाराने झाली. माजी मंत्री डाॅ. पतंगराव कदम हे त्यांचे व्याही होत. मध्यरात्री झालेल्या निधनानंतर.. आज सकाळी त्यांचे पार्थिव सासवडला निवासस्थानी आणले. आज दुपारी तीन वाजता सासवडला कऱहेकाठी अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय व बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार जगताप यांनी सांगितले.    

Web Title: Pune news former MLA Chandukaka Jagtap is no more