विमानतळ, रेल्वे स्थानकांवर फळविक्री केंद्रे उभारू - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पुणे - जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय फळांना मागणी वाढविण्यासाठी द्राक्ष, सफरचंद आणि संत्र्यासारख्या उच्च प्रतीच्या फळांची कायमस्वरूपी विक्री केंद्रे विमानतळ आणि रेल्वे स्थनकांवर उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून केला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिले.

पुणे - जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय फळांना मागणी वाढविण्यासाठी द्राक्ष, सफरचंद आणि संत्र्यासारख्या उच्च प्रतीच्या फळांची कायमस्वरूपी विक्री केंद्रे विमानतळ आणि रेल्वे स्थनकांवर उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून केला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे "महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघा'च्या 57 व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, संघाचे अध्यक्ष सुभाष आरवे, खासदार अनिल शिरोळे, हरिश्‍चंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी दीपप्रज्ज्वलन करून तीनदिवसीय अधिवेशनाचे औपचारिक उद्‌घाटन करण्यात आले. "द्राक्षवृत्त' या विशेषांकाचे प्रकाशनदेखील या वेळी करण्यात आले.

गडकरी म्हणाले, 'जागतिक बाजारपेठेत राज्यातील द्राक्षांचा मोठा वाटा आहे. द्राक्ष, बेदाणे आणि वाइन उत्पादनामध्ये संशोधनाची जोड दिल्यास फळांची गुणवत्तावाढ तर उत्पादनावरील खर्च कमी करता येईल. शीतगृहे, गोदामे आणि वाहतुकीसाठी रस्ता, हवाई आणि रेल्वेमार्गांसह जलवाहतुकीलादेखील चालना देण्यात येणार आहे. सध्या देशातील 11 नद्यांवर जलवाहतूक सुरू केली जाणार आहे, त्यामुळे देशांतर्गत आणि परदेशात फलोत्पादन कमी वाहतूक खर्चात पाठविण्यात येईल. जागतिक बाजारपेठांमध्ये फळांची मागणी वाढविण्यासाठी विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी फळविक्री केंद्रे उभारण्यात येतील, त्यासाठी "ऍग्रिकल्चर प्रोड्यूस एक्‍स्पोर्ट डेव्हलपमेंट'ने (आपेडा) पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

पवार म्हणाले, 'केंद्र सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना परवडणारे आधुनिक तंत्रज्ञानावरील यंत्रे, विपणन (मार्केटिंग) आणि शीतगृहे उपलब्ध करून दिली पाहिजे.''

फुंडकर म्हणाले, 'ग्रेपनेट'द्वारे जागतिक बाजारपेठांमध्ये द्राक्षे, बेदाणे विक्रीसाठी 1 सप्टेंबरपासून निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी सुरू आहे. त्यासाठीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.''

या वेळी संघाचे अध्यक्ष आरवे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

Web Title: pune news fruit sailing center on airport railway station