फुरसुंगी उड्डाण पुलाच्या रस्त्याची चाळण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

फुरसुंगी - सासवड रस्त्यावरील फुरसुंगी उड्डाण पुलाच्या वाहतूक रस्त्याची चाळण झाली असून, नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच अपघाताचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलाचा रस्ता दहा दिवसांत दुरुस्त केला नाही, तर पुलावरच रास्ता रोको करू, असा इशारा माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी दिला आहे. 

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या या उड्डाण पुलावर क्षमतेपेक्षा तिप्पट जड वाहतूक सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या अनेक वर्षांत रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण झालेच नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सहासहा फुटांचे पदपथ बांधून ठेवल्याने प्रत्यक्ष वाहतुकीचा रस्ता पंधरा ते वीस फूटच शिल्लक आहे. 

वाहतूक कोंडीचा सामना 
सासवड, कात्रज, हडपसर, पुण्याकडे जाणारी जड वाहतूक रात्रंदिवस सुरू असते. एखादे वाहन आडवेतिडवे शिरले की लगेच वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. रस्त्याला लहानमोठे खड्डे पडल्यानंतरही वेळेत दुरुस्ती न केल्याने रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. दोन तीन ठिकाणी तर दुचाकीस्वारांनाही प्रवास करणे अवघड झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होऊन दिवसभर पुलावर वाहतूक कोंडी होते. 

अपघाताचा धोका 
थोडा पाऊस झाला तरी रस्त्यावरील मातीने रस्ता निसरडा होऊन दुचाकीस्वार घसरतात. खडीवरून घसरून पडण्याचे प्रमाण वाढले असून, कोंडीमुळे पोलिसांनाही पुलावर जाणे शक्‍य होत नाही. सोलापूर मार्गाने हडपसरहून पुणे शहरात जाणारी वाहतूक काही वर्षांपासून सासवड रस्त्याने वळविल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू आहे. महापालिकेच्या कचरागाड्याही बिघाड झाल्याने पुलावर थांबवल्या जातात. 

त्वरित दुरुस्ती न केल्यास आंदोलन 
सासवड रस्त्याचे चौपदरीकरण होईल तेव्हा होईल, निदान सध्या वाहून गेलेला रस्ता, खड्डे तातडीने दुरुस्त करून वाहतूक कोंडी फोडावी. दहा दिवसांत पुलाच्या रस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर राष्ट्रवादीच्या वतीने पुलावरच रास्ता रोको करू, असा इशारा माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे, पंचायत समिती सदस्या रोहिणी राऊत, प्रवीण कामठे, बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश हरपळे, रमेश निवंगुणे, संदीप हरपळे, दत्ता राऊत यांसह ग्रामस्थांनी दिला.

Web Title: pune news Fursungi Fly Bridge