खड्डेमुक्तीसाठी योगदानाबद्दल गणेश मंडळे सकारात्मक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - पुणे खड्डेमुक्त झाल्यास अपघातांची संख्या कमी होईल, या विचाराने धर्मादाय आयुक्तालयाने सुरू केलेल्या "खड्डे बुजवा, जीव वाचवा' या अभियानाला शहरातील गणेश मंडळांनी आज सकारात्मक प्रतिसाद दिला. पाऊस वा अन्य कारणांमुळे रस्त्यांवर पडलेले, अपघातास कारणीभूत ठरू शकणारे आपापल्या भागातील खड्डे मंडळांनी सामाजिक जबाबदारी समजून बुजवावेत, ही या अभियानामागची संकल्पना आहे. 

पुणे - पुणे खड्डेमुक्त झाल्यास अपघातांची संख्या कमी होईल, या विचाराने धर्मादाय आयुक्तालयाने सुरू केलेल्या "खड्डे बुजवा, जीव वाचवा' या अभियानाला शहरातील गणेश मंडळांनी आज सकारात्मक प्रतिसाद दिला. पाऊस वा अन्य कारणांमुळे रस्त्यांवर पडलेले, अपघातास कारणीभूत ठरू शकणारे आपापल्या भागातील खड्डे मंडळांनी सामाजिक जबाबदारी समजून बुजवावेत, ही या अभियानामागची संकल्पना आहे. 

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश मंडळांची बैठक राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी घेतली. या वेळी प्रमुख मंडळांचे पदाधिकारी, पुणे विभागाचे धर्मादाय सह-आयुक्त शिवाजी कचरे, सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप आदी उपस्थित होते. 

""गणेश मंडळांनी समाजप्रबोधनाबरोबरच खड्डेमुक्त शहर उपक्रम राबवावा, दहा टक्के रक्कम गरीब विद्यार्थ्यांवर खर्च करावी, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे,'' असे आवाहन डिगे यांनी केले. राज्यभर एक लाख गणेश मंडळे आहेत. प्रत्येकाने 10 टक्के रक्कम दिली, तर एक लाख विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळेल, असेही ते म्हणाले. त्यांच्या या आवाहनाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही या वेळी भूमिका मांडली. याबाबत कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे म्हणाले, ""गणेशोत्सव आता जगभर पोचावा, यासाठी आम्ही 35 देशांच्या लोकांशी संवाद साधला असून, या देशातील नागरिक गणेशोत्सवाच्या दरम्यान विविध मंडळांना भेट देणार आहेत. गणेशोत्सवाद्वारे प्रबोधन झालेच पाहिजे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही मंडळांची भूमिका आहे.'' राजेंद्र कोंढरे म्हणाले, ""गणेश मंडळांतील कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा यासाठी पाच कार्यकर्त्यांना आयुक्तालयाकडून औद्योगिक प्रशिक्षण दिले जावे. तसेच, मंडळांसाठी चेंज रिपोर्ट कार्यशाळा घ्यावी.'' अखिल मंडई मंडळाचे अण्णा थोरात यांनी "खड्डे बुजविण्याचे काम आम्ही करूच; पण महापालिकेनेही त्याला योग्य ते सहकार्य करावे,' असे आवाहन केले. 

संबंधित अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार : डिगे 
"शहरातील खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेचे आहे, ही मंडळांची भूमिका बरोबर आहे; परंतु आपल्या घरासमोर खड्डा पडल्यानंतर आपण पालिकेची वाट न पाहता तो बुजवून अपघात होणार नाही याची काळजी घेतोच ना! याच भूमिकेतून मंडळांनी उत्सव संपल्यानंतर आपापल्या परिसरात काम करावे. प्रत्यक्ष काम सुरू होईल त्याआधी संबंधित अधिकाऱ्यांशीही चर्चा करून पुढील दिशा निश्‍चित केली जाईल. पुण्यातील मंडळांची प्रबोधनाबरोबरच सामाजिक जबाबदारी उचलण्याची मोठी परंपरा आहे, ही जबाबदारीदेखील गणेश मंडळे पार पाडतील, असे उद्‌गार धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी "सकाळ'शी बोलताना काढले. 

धर्मादाय आयुक्तांची संकल्पना चांगली आहे. म्हणून खड्डेमुक्ती ही पालिकेची जबाबदारी असली, तरी सामाजिक जबाबदारी समजून या मोहिमेत आम्ही निश्‍चितपणे सहभागी होऊन आमचा वाटा उचलू, शहर खड्डेमुक्त करण्यास योगदान देऊ! 
- अशोकराव गोडसे,  अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट 

Web Title: pune news ganesh mandal