पुण्यातील ‘ग्रॅंड’ गणेशोत्सव पर्यटनाचा ‘ब्रॅंड’ व्हावा!

पुण्यातील ‘ग्रॅंड’ गणेशोत्सव पर्यटनाचा ‘ब्रॅंड’ व्हावा!

पुणे - आपण सारेच उत्सवप्रिय आहोत. दरवर्षी येणारे उत्सव धूमधडाक्‍यात साजरे करतो. उत्सवाच्या परंपरा अत्यंत श्रद्धेने आणि भावुक अंत:करणाने जपतो; परंतु साजरे होणारे उत्सव विशेषत: सामुदायिक उत्सव प्रत्येक वर्षाला नव्या उंचीवर नेऊन किंवा वेगळेपणाने कसे साजरे करता येतील, यावर अपवादानेच विचार होताना दिसतो. पुण्याचा लोकोत्सव, लोकप्रिय गणेशोत्सव अवघ्या दोन-सव्वादोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने पुन्हा संधी आली आहे. ती वाया जाऊ देऊ नये; गणेशोत्सव ‘ग्रॅंड’ असतोच, तो पर्यटनाचा जागतिक ‘ब्रॅंड’ कसा होईल, यावर विचार व्हायला हवा.

उत्सव सुरू होण्याला आणखी दोन-सव्वादोन महिने बाकी असताना एवढ्यात या विषयाबद्दल सांगण्याची काय गरज आहे, असा प्रश्‍न साहजिकपणे पडू शकतो. परंतु गणेशोत्सवाच्या तयारीला आता वेग येणार असल्याने याच वळणावर हा मुद्दा सर्वांपर्यंत पोचवणे महत्त्वाचे ठरणार आहे. या अनुषंगाने तयारी केली तर गणेशोत्सवाचे स्वरूप बदलणे आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचविणे शक्‍य होईल.

पुण्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे, मोठा लोकाश्रय आहे. शहरातील हा सर्वाधिक लोकप्रिय उत्सव बनला आहे. अत्यंत मनोभावे साजरा होणारा हा एकमेव लोकोत्सव असावा. श्रद्धा, कलात्मकता, उत्कटता, सामूहिक शक्ती, झगमगाट याबरोबरच भव्यता यांचा अभूतपूर्व मिलाफ येथे पाहायला मिळतो. या उत्सवामुळे शहर आणि परिसरात चैतन्य निर्माण होते. गणेशोत्सवाचा काळ आणि त्याआधीचे काही दिवस बहरलेले असतात. एवढी अनेकविध वैशिष्ट्ये असलेला हा उत्सव पर्यटनाचा ‘ब्रॅंड’ का होणार नाही? जगाचे आकर्षण केंद्र होण्यासाठी म्हणून जे काही लागते ते सर्व या उत्सवात आहे. आता गरज आहे त्यादृष्टीने याकडे पाहण्याची, उत्सवातील त्रुटी दूर करण्याची आणि या महाऊर्जेला दिशा आणि गती देण्याची. 

संपन्न सांस्कृतिक-ऐतिहासिक तसेच राजकीय वारसा लाभलेला गणेशोत्सव यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने हा लोकोत्सव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाची सांस्कृतिक पर्यटन पर्वणी ठरावा, अशी अपेक्षा सर्वांनीच बाळगायला हवी. हा उत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचविण्यासाठी या निमित्ताने धोरण तयार करून त्याची पद्धतशीरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

सिंगापूरला गेल्यानंतर तेथील ‘विंग्ज ऑफ टाइम’ हा शो आवर्जून पाहिला जातोय. विदेशातील पर्यटकांची तोबा गर्दी असते. तो तेथील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरलेला आहे. थायलंडमध्ये तेथील संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या अशा शोचे आयोजन विदेशातील पर्यटकांसाठी केले जाते. विशेष म्हणजे फुकेतमधील ‘फॅंटसी’ शो-मध्ये हनुमान, महालक्ष्मी हे देखील पाहायला मिळतात. इंडोनेशिया, श्रीलंकेमध्येही अशाच स्वरूपाच्या शोचे आयोजन होते. या देशांच्या लोकसंस्कृतीचे सादरीकरण विदेशातील पर्यटक डोळ्यांत साठवून ठेवतात. या शोला प्रचंड गर्दी होत असते. आपल्या देशात तर अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी जगाची आकर्षण केंद्रे बनू शकतील. गणेशोत्सवाचा काळ तर यासाठी सर्वांत मोठी पर्वणी ठरावी. विदेशातील सांस्कृतिक सादरीकरणाच्या धर्तीवर पुण्यामध्येही आपण ‘आंतरराष्ट्रीय गणेशोत्सवा’चे आयोजन करू शकतो. 

गणेशोत्सवाच्या काळात व्यापक दृष्टी ठेवून, नेटकेपणाने नियोजन केल्यास ते देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरेल, हे नक्की ! हे साध्य करणे कठीण आहे, असे काही जणांना वाटेल. परंतु या आपल्या पुण्यामध्ये काहीही अवघड नाही. शहराचे महापौर या उत्सवाचे यजमान असतात आणि जेथे हजारो प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी एकाच ध्येयाने काही महिने राबते, तेथे काहीही अशक्‍य नाही. यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन गणेशोत्सवाला वैश्‍विक स्वरूप दिल्यास पुण्यामध्ये मोठे परिवर्तन घडू शकेल. त्यासाठी सर्व समविचारी मंडळे, व्यक्ती, संस्था, पोलिस यंत्रणा, अधिकारी यांनी एकत्र बसून विचारविमर्श सुरू करायला हवा. गणेशोत्सवाच्या सामर्थ्याचा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिल्यांदा वापर झाला. आता तब्बल सव्वाशे वर्षांनंतर या अमर्याद सामर्थ्याचा उपयोग या पद्धतीने करून घेणे, हेच मोठे पाऊल आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात श्री गणेशाची लोक चळवळीला साथ घेण्याचे स्वप्न लोकमान्य टिळकांनी पाहिले आणि ते सत्यात आणले. आता हा उत्सव जागतिक सांस्कृतिक पर्यटनाचा ’ब्रॅंड’ बनवण्याचे स्वप्न आपण पाहायला हवे आणि सत्यात आणायला हवे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com