गुरुजी, जरा विकासाकडे लक्ष द्या!

उमेश शेळके
बुधवार, 24 जानेवारी 2018

गेल्या काही वर्षांत गिरीश बापट यांच्या रूपाने शहराला पालकमंत्री मिळाले. त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, शहराच्या हिताचे निर्णय होतील, अशी अपेक्षा होती; परंतु गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारकडून जे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले, ते पाहता शहराचे प्रश्‍न गतीने मार्गी लावण्याऐवजी ते वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शहराच्या राजकारणात बापट हे ‘गुरुजी’ म्हणून ओळखले जातात. सरकारकडून शहर विकासाचे निर्णय घेताना त्यात बापट यांनीही हस्तक्षेप करण्याची गरज होती; मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे ‘गुरुजी, जरा लक्ष द्या!’ अशी म्हणायची वेळ पुणेकरांवर आली आहे.

राजकारणाचा आणि शहराच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव बापट यांच्या पाठीशी आहे. शहराच्या प्रश्‍नांची नेमकी जाण त्यांना आहे. ते सोडविण्याची तळमळदेखील त्यांच्याकडे आहे; परंतु इतकी वर्षे विरोधक असल्याचे कारण पुढे करणे त्यांना सोयीचे जात होते. आता मात्र ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे सर्वर्थाने शहराचे प्रश्‍न गतीने कसे मार्गी लागतील, याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सरकारकडून जे निर्णय घेतले जात आहेत, त्या निर्णयांचा शहरावर दीर्घकालीन काय परिणाम होणार आहेत, त्याकडे एकाही आमदाराचे किंवा पालकमंत्र्यांचे लक्ष नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. 

झोपडपट्टी पुनर्वसन योजना, टेकड्यालागत शंभर फूट परिसरातील बांधकामांवर बंदी, समानपाणी पुरवठा योजना, बीआरटीचा विकास, पुरंदर विमानतळ, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, दौंड-पुणे-लोणावळा लोकल सेवा, एचसीएमटीआर रस्ता, अशा महत्त्वपूर्ण योजना पूर्णपणे मार्गी लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. सत्ता बदल होऊनही कारभार मात्र कासव गतीनेच सुरू आहे. सरकारच्या पातळीवर निर्णय घेतला जात असताना अनेक चुका होताना दिसत आहेत. आमदार आणि पालकमंत्र्यांच्या सुदैवाने विरोधक शांत आहेत. सत्तेत असले तरी पुढाकार घेऊन चुकीचे निर्णय दुरुस्त करण्यासाठी हिम्मत दाखविण्याची गरज असताना भाजपच्या एकाही नेत्याकडून त्यावर भाष्य करणेदेखील टाळले जात आहे. हे शहराच्या हिताचे नाही. राजकारण तर सुरूच राहील; परंतु विकासाचे काय, असा प्रश्‍न आता पुणेकर उपस्थित करू लागले आहेत. पुण्याचे प्रश्‍न जाणीवपूर्वक मार्गी न लावता ते रखडविण्याचे काम केले जात आहे का, अशी शंकादेखील यानिमित्ताने व्यक्त होत आहे. विकासाच्या मुद्दावरून चर्चेत राहण्याऐवजी गुरुजी तुम्ही ‘दुसऱ्या’च करणासाठी चर्चेत राहत असल्याचे यावरून दिसून येत आहे! 

Web Title: pune news girish bapat